महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील दोन रत्न समीर चौघुले आणि ईशा डे लवकरच 'गुलकंद' या मराठी सिनेमात दिसणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सई ताम्हणकर-समीर चौघुले आणि प्रसाद ओक ईशा डे या आगळ्यावेगळ्या जोड्या आहेत. ईशा डे चा हा पहिलाच सिनेमा आहे. ईशाने लंडनमध्येस ड्रामाचं शिक्षण घेतलं. त्याचा हास्यजत्रेसाठी काही उपयोग झाला का? या प्रश्नाचं ईशाने उत्तर दिलं आहे.
लंडन आणि इथला काय फरक जाणवला आणि तिथे शिकल्याचा काही उपयोग झाला का?'बोल भिडू'ला दिलेल्या मुलाखतीत ईशा डे म्हणाली,"हो, कारण मला वाटतं तिकडे इंग्रजीत शिकले म्हणजे काहीतरी वेगळं शिकले असं नाही. आर्ट तेच आहे, क्राफ्ट तेच आहे. कॅरेक्टरायजेशन, इम्प्रोवायजेशन हे तिथेही होतंच. क्लासिकल थिएटरही करत होतो. पण हास्यजत्रेआधी मी असं पूर्ण कॉमेडी प्रोजेक्ट कोणतं केलंच नव्हतं. ज्यात वेड्यासारखी कॉमेडीच आहे. फक्त एक धागा घेवून त्यावर काही मिनिटं कॉमेडी करायची हे खूप कठीण आहे. मला आजही ते कठीणच वाटतं. शिक्षण घेऊन आले वगरे ठिके पण कठीण आहेच. मला फायदा नक्कीच झाला पण हास्यजत्रेत मला त्याचा १०० टक्के वार करता आला नाही. कारण आपल्याला वेळ कमी असतो."
ती पुढे म्हणाली,"गुलकंद सिनेमासाठी मात्र मी प्रॉपर कॅरेक्टरायझेशन करुन सगळं केलं. सिनेमासाठी खूप फायदा झाला. भूमिका म्हणून रिअॅक्ट होणं मला लंडनमधील शिक्षणातून शिकायला मिळालं. गुलकंद मधली रागिणी माने ही ईशासारखी अजिबात नाही. ती खूप खास आहे जे मला शिक्षणामुळे साकारता आलं."
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.