ब-याचदा कलाकारांना शूटिंगवेळी दुखापत होते. 'साजणा' या मालिकेतील 'रमा' भूमिका साकारणारी पूजा बिरारीला शूटिंग करता करता दुखापत झाली. मालिकेचा पहिला भाग चित्रित करत असतानाच तिचा पाय दुखावला. तातडीने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. अशा स्थितीत, पाय दुखत असतानाही तिने पुढील चित्रीकरण थांबवले नाही.तिची कामासाठीची निष्ठा बघून सेटवर सा-यांनाच तिचे कौतुक करत होते.
चिंगी आणि रमा या बहिणी नाशिकला मामाच्या गावी गेलेल्या असतात, त्यावेळी जत्रेत घडणाऱ्या एका अपघाताचा प्रसंग चित्रित करत असताना ही घटना घडली. जत्रेत उधळलेला घोडा चिंगीच्या अंगावर धावून जातो व प्रताप चिंगीला त्या घोड्यापासून वाचवतो असा तो प्रसंग होता. पण, या चित्रीकरणाच्यावेळी घोडा खरंच उधळला आणि सेटवर खरोखरच एक अपघात घडला. उधळलेल्या घोड्याला शांत करतानाचे प्रतापचे साहस पाहून ऑनस्क्रीन हरखून गेलेली पूजा, प्रत्यक्षात मात्र त्याच घोड्यामुळे दुखापतग्रस्त झाली. तिला लगेचच रुग्णालयात न्यावे लागले.
पायाला प्लास्टर सुद्धा घातले गेले. अशा परिस्थितीत सुद्धा आराम करण्याऐवजी पुढील चित्रीकरण सुरु करण्याचा पर्याय पूजाने निवडला. त्यामुळेच फार व्यत्यय न येता चित्रीकरण पूर्ण झाले. दुखापतग्रस्त असतानाही पूजाने कामाला अधिक महत्त्व दिलेले पाहून, सेटवर सगळेच जण भारावून गेले होते. कामावर इतकी श्रद्धा असलेली ही अभिनेत्री येत्या काळात नक्कीच खूप यशस्वी होईल यात शंका नाही.