अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करताना दिसत आहे. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत आणि ते चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देतात. तसेच ते त्यांच्या सिनेमातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
मिलिंद गवळी यांनी सिनेमातील व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'हक्क' मराठी सिनेमा अशोक श्रीवास्तव निर्मित आणि गोरख जोगदंडे दिग्दर्शित, संगीतकार पंकज पडघम, संवाद योगेश मार्कंडे, कलाकार स्मिता शेवाळे आणि औरंगाबादचे बरेच कलाकार, या चित्रपटाचा संपूर्ण शूटिंग औरंगाबाद जवळ एका जंगलात झालं, इतकी मरणाची थंडी होती की तोंडातून संवादच फुटत नव्हते, जंगलातलं अतिशय सुंदर निसर्ग रम्य वातावरण, गडचिरोली येथील नक्षलवादी संघटनेचा लीडर त्याच्या जीवनावर आधारित ही गोष्ट, अशोक श्रीवास्तव ज्या वेळेला माझ्याकडे हा सिनेमा घेऊन आले आणि त्यांनी या सिनेमाची गोष्ट ऐकवली त्याच वेळेला मी त्यांना म्हटलं की या गोष्टी सारखाच एक सिनेमा मी केला आहे, त्या चित्रपटाचं नाव होतं 'अपहरण'. नक्षलवाद्यांवर आधारितच तो पण चित्रपट होता. पण त्यांनी मला खूप आग्रह केला की हा चित्रपट करावा. मला नाही म्हणता आलं नाही.
स्मिता शेवाळे या अभिनेत्रीने माझ्याबरोबर मी दिग्दर्शित केलेल्या 'अथांग' चित्रपटांमध्ये काम केलं असल्यामुळे आमची आधीच छान ट्युनिंग झाली होती. या चित्रपटातले आम्हा दोघांचे रोल फार सोपे नव्हते, या सिनेमाची भाषा गोंद, गडचिरोलीची ग्रामीण भाषा. पण स्मिताशी माझा चांगला परिचय असल्यामुळे, एकमेकांबरोबरचे सीन्स अतिशय छान झाले, संपूर्ण चित्रपटात बहुतेक सीन्स आमचे एकत्रच होते, असे त्यांनी सांगितले.
''माझं चित्रपट क्षेत्र जय हो''
त्यांनी पुढे लिहिले की, मी केलेल्या 'अपहरण' आणि हा चित्रपट 'हक्क'ची गोष्ट जरी सारखी असली तरी सुद्धा, दोन वेगळे भिन्न चित्रपट तयार झाले, प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला बंदुकीबरोबर कधी खेळता येत नाही, पण अशा चित्रपटांमध्ये तुमच्याजवळ सतत एखादी बंदूक असतेच, दिवसभर त्या बंदुकीबरोबर आपण चाळा करू शकतो, त्या बंदुकीतल्या गोळ्या खोट्या असतात म्हणून मनात येईल तेव्हा त्या हवेत उडवू शकतो, आणि अशा बंदुकीने कोणाला इजा होत नसल्यामुळे, त्याची एक मजाच वेगळी असते, माझे वडील सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्यांच्याकडे शासनाने दिलेली त्यांची एक बंदूक होती, पण माझ्या आईने माझ्या वडिलांच्या बंदुकीला कधीही मला हात लावू दिला नाही, त्यामुळे लहानपणापासून घरात बंदूक जरी असली तरी सुद्धा त्याला आपण कधी हात लावायचा नाही, याची मला कल्पना होती, पण बंदुकीविषयीचं कुतूहल काही कमी नव्हतं, या सिनेमाच्या माध्यमाने मला माझा हा लहानपणापासूनचा छंद जोपासण्याची संधी मिळाली, मी आणि माझा कॉलेजचा वर्गमित्र शशांक सोळंकी आम्ही नॅशनल रायफल असोसिएशनचे मेंबर झालो होतो, स्पोर्ट्स म्हणून रायफल शूटिंग करायचो, कॉलेज सुटल्यानंतर बंदुकीची प्रॅक्टिसही सुटली, पण अशा चित्रपटात मध्ये माझी ती हौस फिटली जायची. त्यामुळे माझं चित्रपट क्षेत्र जय हो.