सन मराठी वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. या मालिकेत बालकलाकार आरंभी उबाळे ही ‘बिट्टी’ची भूमिका साकारत आहे. १४ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेतील आरंभीने साकारलेली ‘बिट्टी’ची भूमिका सर्वांनी पाहिलीच असेल. आरंभीचा गोडवा हा बिट्टीमध्ये उतरला आहे, म्हणजे बिट्टी हे पात्रं प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा तयार करणार यात शंका नाही.
आरंभीला तिच्या वयाच्या अडीच वर्षापासून कॅमेरासमोर कसं वावरायचं या विषयी योग्य असे मार्गदर्शन तिच्या आईकडून मिळाले आणि त्याचा फायदा तिला पुढे झाला. आरंभीने जाहिरातीत काम केले आहे. ‘गुम है किसीं के प्यार में’ आणि ‘अनुपमा’ या दोन हिंदी मालिकेत आणि ‘क्षण’ या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय केला आहे. मराठीमध्ये काम करण्याची तिची इच्छा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली.
आरंभी ही 'वन टेक आर्टिस्ट' आहे
आरंभीचे कौतुक झालेच पाहिजे हे म्हणण्यामागे कारण की, आरंभी ही ‘वन टेक आर्टिस्ट’ आहे. ‘एकाच टेकमध्ये परफेक्ट शॉट देणारी बालकलाकार’ असे सेटवर अनेकांचे मत आहे. दिवसभर सेटवर असणारी आरंभी अभ्यास देखील मनापासून करते. अभिनय आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमधला समतोल आरंभी आणि तिच्या आई-वडीलांनी सांभाळला आहे. मुळात, घरातील शिस्तप्रिय वातावरण असल्यामुळे आरंभीमध्ये समजूतदारपणा, मेहनत करण्याची तयारी, मोठ्यांप्रती, कामांप्रती आदर करण्याचा स्वभाव हा आपसूक आला आहे.
‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत आरंभी, प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत आहे. या मालिकेत आईची संघर्षमय गोष्ट दाखवण्यात आली आहे जी आपल्या मुलीला घेऊन एका मोठ्या श्रीमंत घरात राहतेय पण ती मालकीण नसून, घरातील मोलकरीण आहे. आरंभी आणि सीमा कुलकर्णी यांनी माय-लेकीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं आणि त्या दोघी प्रत्येक परिस्थितीला कशा सामोऱ्या जातात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.