Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: 'मन उडू उडू झालं' मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, त्यावर दिपू उर्फ हृता दुर्गुळे म्हणाली...

By तेजल गावडे | Updated: July 21, 2022 16:15 IST

Man Udu Udu Jhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतून कानविंदे कुटुंबातील नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे आणि बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर यांनी मालिकेतून निरोप घेतला आहे. तसेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरणही झाल्याचेही समोर आले आहे. टीआरपी घसरल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा आहे. तसेच कलाकारांच्या तारखा किंवा कलाकारांच्या वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका ऑफ एअर जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule)ने लोकमतशी बोलताना मालिका ऑफ एअर जाण्यामागचे कारण निर्मात्यांना माहित असेल असे म्हटले आहे.

मन उडू उडू झालं मालिकेचा टीआरपी घसरल्यामुळे, कलाकारांच्या तारखा किंवा कलाकारांच्या वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका ऑफ एअर जात असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत हृता दुर्गुळेला तिचे मत विचारले असता ती म्हणाली की, कधीही आपल्याला एकच बाजू कळते, दुसरी बाजू समोर येत नाही. कलाकारांच्या तारखा मिळत नाही, अशी ज्यांनी माहिती समोर आणली हे त्यांनाच माहित असेल. मन उडू उडू झालं या मालिकेला एक वर्ष झालं असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला कायमच असं वाटतं दुर्वाच्या बाबतीत असो किंवा फुलपाखरूच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे शो अशावेळी थांबले जेव्हा ते टॉपला होते. आताही मन उडू उडू झालं मालिकेलाही खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

हृता पुढे म्हणाली की, आता मालिका रटाळ झालीय किंवा उगाच ताणलीय अशा टप्प्यावर येऊन नाही थांबली पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा ती कथा चांगल्या वळणावर येऊन पोहचते तेव्हाच ती मालिका ऑफ एअर जाते. मालिका अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वाटतेय तोपर्यंत सुरू ठेवू शकता. ती कशापद्धतीने सुरू ठेवायची हे निर्मात्यांवर अवलंबून असते. पण मन उडू उडू झालं ही मालिका निरोप का घेते आहे, या मागचे खरे कारण निर्मात्यांनाच माहित असेल आणि कलाकारांच्या तारखा मिळत नाही, असे सांगणाऱ्या सूत्रांना माहित असेल कदाचित.

टॅग्स :ऋता दूर्गुळेझी मराठी