छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' ( Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behare) आणि श्रेयस तळपदे (shreyas talpade) यांची मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे मराठीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेची क्रेझ साऊथमध्ये सुद्धा आहे. त्यामुळेच या मालिकेचा कन्नडमध्ये रिमेक करण्यात आला होता. इतकंच नाही तर आता या मालिकेचा उडियामध्येही रिमेक करण्यात आला आहे.
'मराठी टीव्ही इन्फो' या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा उडपी रिमेक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कन्नडमध्ये 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका 'सीथा रामा' या नावाने प्रसारित होत होती. त्यानंतर आता ही मालिका उडियामध्येही प्रसारित होणार आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा उडिया रिमेक. झी मराठीची सुप्रसिद्ध मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' चा कन्नडा रिमेक 'सीथा रामा' नंतर आता उडिया भाषेमध्ये 'श्री' नावाने झी सार्थक वाहिनीवर लवकरच रिमेक होणार आहे, असं कॅप्शन देत ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, उडियामध्ये 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका 'श्री' या नावाने प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता मराठी भाषेची, मालिकांची आणि सिनेमांची क्रेझ फक्त बॉलिवूडपूरती मर्यादित राहिली नसून साऊथमध्येही तिची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येत आहे.