विशाखा सुभेदार ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच विशाखा तिच्या विनोदबुद्धीसाठीही ओळखली जाते. विनोदाची उत्तम जाण असलेली विशाखा अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळवून हसवते. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या विशाखाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. विशाखाचा जबरा फॅन असलेल्या एका चाहत्याने तिला पत्र लिहिलं आहे.
विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन चाहत्याचं हे पत्र शेअर केलं आहे. “हे फार कमाल फीलिंग आहे... जेव्हा एखादा चाहता आपल्याला भेटायला आपलं घर गाठतो आणि भेटच होतं नाही आणि मग एक चिठठी ठेवून जातो. कलाकार म्हणून जन्माला आले त्याकरिता देवाचे आभार आणि कलाकारांवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे आभार...”, असं कॅप्शन विशाखाने या पोस्टला दिलं आहे.
चाहत्याने विशाखाला लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?
मी राजेंद्र माणगांवकर ( M.A.Bed विद्याधिराजा हायस्कूल, भांडुप, पूर्व) येथे सहाय्यक शिक्षक म्हणून आहे. विशाखा ताई तुमचे जगात लाखो चाहते आहेत. त्यातीलच मी एक आहे. परंतु, फरक इतकाच की मी तुमचा भक्त आहे. देव तर कुणीच पाहिला नाही. परंतु, तुमच्या रुपात मी तुम्हांस देव मानतो. यात खरंच अजिबात अतिशयोक्ती नाही.
मला पंधरा वर्षांपूर्वी हृदयाची आजार झाला होता. मी खूप घाबरलो होतो. कारण, घरातील जबाबदाऱ्या खूप होत्या. औषधे चालू होती आणि त्याचवेळी फू बाई फू मधील भाग पाहिला. (वैभव मांगले आणि तुम्ही) तो भाग माझ्या मनाला इतका भावला की तुमचा प्रत्येक भाग तहान भूक विसरुन मी पाहू लागलो. आणि पुढील काही महिन्यांतच मी पूर्ण बरा झालो. ही तुमचीच कृपा नाहीतर काय. त्यानंतर हास्यजत्रेचे भाग नियमित पाहू लागलो. हास्यजत्रेतील सर्वच कलाकार उत्कृष्ट काम करतात. परंतु, सतत तुमची उणीव जाणवते. पण मी मात्र आजही मागील भागांची वाट पाहत असतो.
दोन वर्षांपूर्वी मी, माझी बायको व मुलगा मंदार कालीदासमध्ये शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक पाहण्यास गेलो होतो. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा मोह झाला. मनात भीती असतानाही मी व मंदार मध्यंतरात तुम्हास भेटलो. त्यावेळी माझी व मंदारची आपुलकीने चौकशी केली. मला असीम आनंद झाला. गवाणपाड्यात गेलो असता तेथे एका गृहस्थाला तुमचा पत्ता विचारला. त्याने समोरच्या इमारतीकडे बोट दाखवले. मी दचकत, दबकतच तुमच्या आठव्या मजल्यावरील दरवाजाची बेल वाजवली. पण तुम्ही घरी नव्हता. तुमच्या घरासमोरील एका व्यक्तीने तुम्ही बाहेरगावी गेल्याचे सांगितले. असे दोन चार वेळा झाले. त्यानंतर मी पाचव्या मजल्यावरील श्री पानवलकरांना भेटलो. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी १०च्या आत येण्यास सांगितले. मी खूश झालो. दुसऱ्या दिवशी रिक्षाने येत असताच पानवलकरांनी फोन करुन सांगितले की विशाखाताई आताच बाहेर गेल्या...तुम्ही आता येऊ नका. मी इमारतीखाली बसलो आहे. तरी पण मी त्यांना भेटलो व त्या कधी भेटतील असे आशेने त्यांना विचारले.
आता तर तुम्ही हास्यजत्रेतून बाहेर गेलात याचे मला अतिशय दु:ख झाले. सध्या तुम्ही निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यात ही तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होणार याची मला खात्री आहे. याही क्षेत्रात तुम्ही खूप बिझी असणार पण मन मानायला तयार नाही आणि कधीतरी एकदाच मला तुमची भेट घ्यायची आहे हे कृपया विसरू नका. तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा.
Video : स्टेजवर गाणं गाताना प्रसिद्ध गायिकेवर चाहत्याने दारू फेकली अन्...; पुढे काय घडलं पाहा
विशाखा सुभेदारने शेअर केलेल्या चाहत्याच्या या पत्रावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, सध्या विशाखा स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे.