Join us

नचिकेत लेलेला एलिमिनेट केल्यामुळे संतापले चाहते, 'इंडियन आयडॉल १२'च्या निर्मात्यांवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:33 PM

नचिकेतच्या एलिमिनेशननंतर त्याचे चाहते खूप संतापले आहेत आणि सोशल मीडियावर ते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२मध्ये गेल्या आठवड्यात मोठे एलिमिनेशन झाले. होळी विशेष भागामध्ये सूत्रसंचालक आदित्य नारायणने जाहीर केले की, मागील आठवड्यातील मतांच्या आधारे एका स्पर्धकाला या कार्यक्रमातून पुन्हा घरी जावे लागेल. सर्वात कमी मते मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील स्पर्धक गायक नचिकेत लेलेला या कार्यक्रमातून घरी परतावे लागले. नीतू कपूर यांची विशेष उपस्थिती असलेल्या या भागात तीन स्पर्धकांमध्ये एलिमिनेशन जाहीर होणार होते. यात नचिकेतला सर्वात कमी मते मिळाली आणि तो एलिमिनेट झाला.

या एलिमिनेशन राउंडमध्ये मोहम्मद दानिश, सवाई भट आणि नचिकेत लेले अशा तीन स्पर्धकांचा समावेश होता. या तिघांमध्ये सर्वात कमी मते मिळाल्याने नचिकेत लेलेला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण, सोशल मीडियावर नचिकेत याच्या एलिमिनेशनला चाहत्यांनी‘अयोग्य निर्णय म्हटले आहे.

नचिकेतच्या एलिमिनेशननंतर त्याचे चाहते खूप संतापले आहेत आणि सोशल मीडियावर ते तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. इंडियन आयडॉलमध्ये गाण्याऐवजी स्पर्धकाच्या भावनिक कथेकडे जास्त लक्ष दिले जाते असा आरोपही प्रेक्षकांनी केला आहे.

एलिमिनेशन झाल्यानंतरही नचिकेतने त्याच्या सोशल मीडियावर ‘इंडियन आयडॉल १२’च्या निर्मात्यांचे, तसेच सर्व स्पर्धक, परीक्षकांचे आभार मानले आहेत. पण चाहते म्हणतात की, ‘नचिकेत हा इंडियन आयडॉलमधील प्रतिभावान स्पर्धकांपैकी एक आहे. त्याची विजेता होण्याची गुणवत्ता आहे.’

एका चाहत्याने लिहिले की, ‘नचिकेतने या मंचावर सादर केलेले  ‘एक चतुर नार’ हे गाणे त्याच्यासारखे कोणीही गाऊ शकत नाही.’ खरं तर सिरीशा आणि नचिकेत या स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे बरेच चाहते संतप्त झाले आहेत.

टॅग्स :इंडियन आयडॉल