Join us  

झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप, मंदार देवस्थळींच्या नव्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 1:10 PM

Zee Marathi: गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत असताना आता एक मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. यात अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवा गडी नवं राज्य , सातव्या मुलीची सातवी मुलगी, बस बाई बस, डान्स महाराष्ट्र डान्स या नव्या मालिका आणि रिएलिटी शो दाखल झाले आहेत. देवमाणूस २ ही मालिका देखील निर्णायक वळणावर आली असून तिच्या जागी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रसारित होत आहे. त्यामुळे तू तेव्हा तशी आणि माझी तुझी रेशीमगाठ या केवळ दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. पण, नुकतेच झी मराठी वाहिनीवर आणखी एक नवी मालिका दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ आणि तू तेव्हा तशी या दोन मालिकेपैकी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, याबाबत लवकरच समजेल.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अजून बरेचसे ट्विस्ट आहेत शिवाय टीआरपीच्या बाबतीत टॉप पाचमध्ये ही मालिका आहे. त्यामुळे ही मालिका एक्झिट घेण्याची शक्यता कमी वाटते. त्यामानाने तू तेव्हा तशी या मालिकेचे कथानक बरेचसे पुढे सरकले आहे. त्यामुळे तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मंदार देवस्थळी यांनी अनेक गाजलेल्या मालिकेचं दिग्दर्शन केले आहे.यात आभाळमाया, बोक्या सातबंडे, वादळवाट, अवघाची संसार, जिवलगा, होणार सून मी ह्या घरची, माझे पती सौभाग्यवती, फुलपाखरु, गुलमोहर, हे मन बावरे, मन उडू उडू झालं अशा एकापेक्षा एक सरस ठरलेल्या त्यांच्या मालिका आजवर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मन उडू उडू झालं या मालिकेच्या एक्झिटनंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा झी मराठीची मालिका आली आहे.

या नव्या मालिकेच्या पूर्व तयारीला सुरुवात झाली असून मंदार देवस्थळी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोच्या शूटिंगची तयारी झाली असून यात तुम्हाला प्रथम विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका अध्यात्मिक असेल अशी चर्चा रंगली आहे.
टॅग्स :झी मराठी