Join us

झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:45 IST

शेवटचा सीन शूट करताना या मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला होता.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'मन झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १२ जूनला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. कलाकारांसाठी या मालिकेचं पॅकअप झाले आहे. शेवटचा सीन शूट करताना मन झालं बाजिंद मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाला होता. मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

गेल्या वर्षी २१ ऑगस्टला मन झालं बाजिंद या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. त्याआधी महिन्याभरापासून या मालिकेच्या प्रोमोने लक्ष वेधलं होतं. साताऱ्यातील हळद उत्पादक तरूण आणि गरीब घरातील एक हुशार मुलगी यांच्या प्रेमकथेवर या मालिकेची गुंफण करण्यात आली. रांगडा राया आणि सुंदर कृष्णा यांची प्रेमकहाणी पहिले काही दिवस रंजक वाटली, मात्र त्यानंतर या मालिकेची पकड सैल होण्यास सुरूवात झाली.

हळद कारखानदारी, गावातील राजकारण, घरातील कटकारस्थानं राया आणि कृष्णा यांच्यात सतत होणारे गैरसमज प्रेक्षकांना रूचेनासे झाले. त्यातच काही दिवसांपूर्वी रायाच्या आजोबांची मालिकेत एन्ट्री झाली तेव्हाही मालिका सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आली. अखेर निर्मात्यांनी ही मालिका बंद होत असल्याचं जाहीर केलं. सत्यवान सावित्री या नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे मन झालं बाजिंद निरोप घेणार, हे निश्चित झालं. श्वेता खरात आणि वैभव चव्हाण यांची जोडी या मालिकेत प्रथमच एकत्र आली.

मालिकेत कृष्णाच्या आयुष्यात बिब्बा घालणाऱ्या गुली मावशीचं खरं रूप बाहेर काढत, कृष्णाविषयीचे गैरसमज दूर करत आजोबांचं मन जिंकत ही कथा संपवण्यात आली. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं पॅकअप होताना मात्र प्रत्येक कलाकाराचे डोळे पाणावले. रोज शूटिंगच्या निमित्ताने सेटवर दिवसातील १८ तास एकत्र असणारे कलाकार खूप भावुक झाले होते.

टॅग्स :झी मराठी