आई ज्याप्रमाणे मुलांवर माया करत असते त्याचप्रमाणे मुलांची प्रगती व्हावी, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता वा उणीव भासू नये यासाठी वडील दिवसरात्र मेहनत करत असतात. त्यामुळेच मुलांसाठी झटणाऱ्या वडिलांप्रती आदर, प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे फादर्स डे. आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फादर्स डे साजरा करत आहेत. यामध्येच एण्ड टीव्हीवरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मधील योगेश त्रिपाठी (Yogesh H.Tripathi) ऊर्फ दरोगा हप्पू सिंग यानेही फादर्स डे निमित्त त्याच्या वडिलांच्या काही आठवणी शेअर केल्या. तसंच वडिलांकडून काय शिकायला मिळालं हेदेखील सांगितलं.
'' माझं जर सर्वात जास्त प्रेम कोणावर असेल तर ते म्हणजे माझे वडील. ते माझे गुरू, एक मित्र होते आणि मी अपयशी असतानाही माझ्या पाठीशी उभे राहिले. आत्मविश्वासाने काम करणं आणि ध्येयाचा मागे धावण्याची क्षमता त्यांनीच माझ्यात निर्माण केली. माझ्यात चांगल्या-वाईट काळात ते सुपरहिरोसारखे माझ्या पाठीशी होते, असं योगेश त्रिपाठी म्हणाला.
पुढे तो म्हणतो, टेलिव्हिजनमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी मी पथनाट्य आणि थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याकाळातही त्यांनीच मला साथ दिली. त्यामुळे माझ्या यशाचं श्रेय पण त्यांनाच जातं. त्यांनी आमच्यासाठी खूप कठोर परिश्रम केले. त्यामुळेच आम्ही आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळे. म्हणूनच, त्यांची शिकवण मी माझ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो.