छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. बिग बॉस मराठीचा शो स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या टास्कमुळे वाद घडवून आणतात. त्यामुळे आपली इमेज राखण्यासाठी बहुतेक कलाकार मंडळी यामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या ऑफर नाकारतात. काही माध्यमांनी शोमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. त्यात केतकी चितळे(Ketaki Chitale)चे देखील नाव घेण्यात आले. मात्र बिग बॉसच्या शोमध्ये येण्यासाठी केतकी चितळे उत्सुक नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
केतकी चितळे म्हणाली की, बिग बॉससारख्या कार्यक्रमांना मी पाठिंबा देत नाही हे मी बरोबर एक वर्षापूर्वी स्पष्ट केले होते. अशा नकारात्मकता पसरवणाऱ्या कार्यक्रमाचे मी समर्थन करत नाही. अशा माणसांवर प्रयोग करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणे म्हणजे मी माझा दर्जा कमी करून घेणे आहे. पैशासाठी मी माझा दर्जा कमी करून घेऊ इच्छित नाही’.
केतकी चितळेने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र एपिलेप्सीचा त्रास होत असल्याने तिला तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आले होते असा आरोप तिने त्यावेळी मालिकेच्या टीमवर लावला होता. यानंतर केतकी फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. मात्र आपल्या आजाराबाबत ती इतरांना नेहमी मार्गदर्शन करताना दिसते. आपल्या बेधडक वक्त्याव्यांमुळे केतकी नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली पाहायला मिळाली आहे. अगदी शेजाऱ्यांशी होणारे भांडण असो वा फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे झालेली अटक यामुळे केतकी चितळे हे नाव नेहमीच चर्चेत येत आहे. त्यामुळे तिला मराठी बिग बॉसच्या चौथ्या सीझनसाठी आमंत्रित केले जाईल असे बोलले जात होते. मात्र आता तिने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.