Join us

'शेवटी तालमीत कुनाच्या तयार झालोय?', किरण मानेंची आखाड्यातील मामासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 1:23 PM

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मामासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तसेच ते बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचले. तसेच ते सोशल मीडियावर आजूबाजूला घटनेवर व्यक्त होत असतात. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से शेअर करत असतात. दरम्यान आता त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मामासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी मामांचा फोटो शेअर करत लिहिले की, तानाजीमामा ! ल्हानपनीचा माझा 'हिरो' !! मी सात आठ वर्षांचा होतो... मामा सातारच्या तालीम संघात होता. पैलवानकी करायचा. अंगानं बारीक पन पिळदार शरीर. उंचीबी बेताचीच. पन लै चलाख आनी चपळ. आखाड्यात एन्ट्री मारल्या-मारल्या लाल माती कपाळाला लावून एका हाताचं बोट वर करून "छत्रपती शिवाजी महाराज की जयSS" म्हनत लंगडी घालत वेगानं संपूर्न आखाड्याला फेरी मारायचा.. पब्लिक चेकाळायचं. टाळ्या-शिट्ट्या... एखाद्या जवान सापासारखा सळसळ सळसळ करत फिरायचा.

त्यांनी पुढे म्हटले की, एका फडाला कोल्हापूरातला एक नामांकित पैलवान आलावता. अख्ख्या पच्चीम म्हाराष्ट्रात त्याला बोलबाला हुता.. आंडवातिडवा रांगडा धिप्पाड गडी... त्येच्याशी माझ्या मामाची जोड लावली. सगळी हसली. त्येच्याफुडं तानाजीमामा लैच बारीक दिसत व्हता.. घोटीव शरीर पन चन छोटी. मी लै घाबरलो. माझ्या वडीलांचा हात घट्ट धरला. शड्डू ठोकून कुस्ती सुरू झाली... मामाची सळसळसळसळ सुरू झाली. दोघांनी एकमेकांच्या मानंवर हात ठेवताच त्या पैलवानानं मामाला थप्पड मारली.. डोळ्याची पापनी लवायच्या आत मामानं साट्टदिशी त्याला उलटी लगावली.. त्यो सटपाटला... डोळ्याफुडं चांदन्या दिसल्यागत चेहरा झाला.. पंच दोघांच्या मधी आला.. त्यानं दोघांनाबी सक्त ताकीद दिली...तिथनं फुडं लै धुमाकूळ सुरू झाला दोस्तांनो. डाव-प्रतिडावाच्या उकली सुरू झाल्या... तीनचार मिन्टात खेळ संपंल असं वाटत असतानाच मामानं त्या पैलवानाला घाईला आनलं. त्येनं डाव टाकला की मामा निसटायचा. यवढा आडवातिडवा गडी, पन मामाच्या चपळतेफुडं हतबल व्हायला लागला... घामाघूम होऊन धापा टाकाय लागला. प्रेक्षकांना मज्जा वाटायला लागली. सगळे मामाच्या बाजूनं जल्लोष करायला लागले. त्यो पैलवान 'दिल टाकल्यागत' कराय लागला. अचानक त्यो पैलवान मामाच्या पटात घुसला. अर्ध्या सेकंदात मामानं बगलंत हात घालून त्या अवाढव्य पैलवानाला पाठीवर उतानं पाडलं.., असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले.

सगळी ताकद तुमच्याकडनं आलीय मला.. लोकांनी जल्लोष करून आखाड्यात घुसून मामाला डोक्यावर घेतला आणि नाचायला लागले, तवाच त्या पैलवानाला काय झालं ते कळलं....तर अशा मामाचा मी भाचा हाय दोस्तांनो ! मामा आजकाल बारामतीजवळ कोर्‍हाळ्यात असतो. 'बापू' या टोपननांवानं फेमस. शेतीत रमलाय. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो.. कपड्यांवरनं कुनाला वाटनार नाय, पन इश्टेट मोजली तर करोडोंच्या घरात जाईल. मामा, गेल्या वर्ष-दीड वर्षांत मी जे काय केलं.. विपरीत परीस्थितीशी-हितशत्रूंशी लढलो.. हिमतीनं उभा राहिलो.. ती सगळी ताकद तुमच्याकडनं आलीय मला.. प्रत्येक संकटाला 'चितपट' केल्यावर मी म्हन्तो, "शेवटी तालमीत कुनाच्या तयार झालोय?" लब्यू मामा, असे किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :किरण मानेबिग बॉस मराठी