अनेकदा करिअरच्या शिखरावर असूनही वैयक्तिक अनुभवांमुळे अभिनेत्यांचं उर्वरीत करिअर बर्बाद होतं. अशीच गोष्ट घडली एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यासोबत. या अभिनेत्याच्या पत्नीने आणि त्याच्या मित्रानेच कट करुन त्याचं करिअर संपवलं. या अभिनेत्याचं नाव आहे संदीप आनंद. ‘एफ.आय.आर.’ आणि ‘मे आय कम इन मॅडम?’ यांसारख्या मालिकांमधून संदीप आनंदला (sandeep anand) प्रचंड लोकप्रियता मिळाली. संदीपने एका मुलाखतीत पत्नी आणि त्याच्या मित्राने मिळून त्याच्यावर विषप्रयोग कसा केला, याचा धक्कादायक खुलासा केला.
संदीपने एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला. संदीप आणि त्याची पत्नी लग्नाआधी केवळ २-३ वेळा भेटले होते. लग्नानंतर संदीप जेव्हा मुंबईत आला, तेव्हा शूटिंगमुळे त्याला घरी वेळ देता येत नव्हता. ‘मे आय कम इन मॅडम’ या शोच्या शूटिंगदरम्यान त्याची तब्येत सतत बिघडत होती. संदीपचं वजनही खूप वाढलं होतं. नंतर त्याला कळले की, जेवणात त्याची बायको त्याला स्लो पॉइजन देत होती.
घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर संदीपला आणखी मोठा धक्का बसला. त्याचा बालपणीचा मित्रसुद्धा या फसवणुकीत सहभागी होता, हे त्याला समजलं. तो मित्र आता संदीपची पत्नी आणि मुलासह गायब झाला आहे. घटस्फोटाच्या वेळी संदीपने सर्व मालमत्ता पत्नीच्या नावावर केली आणि स्वतः काही काळ आश्रमात राहून मानसिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न केला. या अनुभवामुळे संदीपचं जीवन उध्वस्त झाले होते, मात्र आता तो हळूहळू सावरत आहे.