Join us

आधी ब्रेनस्ट्रोक मग पॅरालिसिस.., 'सावळ्याची जणू सावली'मधील अभिनेता मृत्यूच्या दाढेतून आला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:34 IST

मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्यावर एकानंतर एक संकट धावून आली. ब्रेन स्ट्रोक आणि पॅरालिसिसच्या झटक्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता.

मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्यावर एकानंतर एक संकट धावून आली. ब्रेन स्ट्रोक आणि पॅरालिसिसच्या झटक्यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. डॉक्टरांनीदेखील तो बरा होण्याची आशाच सोडली होती. मात्र त्याने या संकटावर मात केली. हा अभिनेता म्हणजे लग्नाची बेडी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेत काम केलेला अभिनेता सुप्रित कदम (Suprit Kadam). तो मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. नुकतेच त्याने पोस्ट शेअर करत त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे.

सुप्रित कदमने त्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, दिवसामागून दिवस गेले आणि आज त्या गोष्टीला वर्ष झाले. हे वर्ष खूप म्हणजे खूप काही शिकवून गेले. खूप गोष्टींचे महत्व शिकवून गेले.. कारण मागच्या वर्षी याच दिवशी मला ब्रेन स्ट्रोक येऊन पॅरलिसिसचा अटॅक आला होता. काही वेळासाठी डॉक्टरांनी सुद्धा गॅरेंटी सोडली होती. भावाचे रडून हाल... जीवन मरणाच्या दारात असताना एक वाटत होता की मला माझ्या मित्रांना खूप काही सांगायचे आहे त्यांच्याशी खूप बोलायचं आहे, हसायचं आहे, मजा करायची आहे. माझ्या बायकोची काही स्वप्ने ती पूर्ण करायची आहे वीराला शाळेत जाताना बघायचे ..माझ एवढेच आयुष्य होते.. पण ते म्हणतात ना आपण कुठेतरी चांगली काम करतो ते कामी येत तसेच काहीस झाले..

त्याने पुढे लिहिले की, देव माझ्यासोबत होता… पण देवाला प्रत्येक ठिकाणी मला मदत कारण शक्य नाही. म्हणून त्यांनी काही माणसे माझ्या आयुष्यात नेमून दिली आहे. मला दुसरे जीवन देणारी माझे मित्र ..शुद्धीत आलो तेव्हा सगळे सामोर उभे होते अगदी देवासारखे. वाटले नव्हते सगळे देवाच्या रूपात माझ्या समोर येतील. आयुष्यात जी काही भांडणे झाली जे काही गैरसमज झाले ते सगळे विसरून माझ्या बरोबर उभे होते. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने सांगू इच्छितो गैरसमज, राग, रुसवे, दुश्मनी, हे सगळे माणूस जिवंत असेपर्यंत एकदा तो निघून गेला की राहतो तो पश्चाताप.. तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल, कोणाला माफ करायचे असेल तर करुन टाका कारण दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती असेल की नसेल माहित नाही… हात जोडून मनापासून आभार जे माझ्या बरोबर उभे होते.. मित्र भाऊ असावेत तर असे.