‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता खूपच वेगळ्या वळणावर आली आहे. अरुंधतीला आधी पतीने धोका दिला आणि आता मुलाने धक्का दिलाय. त्यामुळे अरुंधतीचं आयुष्यच आता ढवळून निघाले आहे. अनिरुद्धसह २५ वर्षे संसार केल्यानंतर अरुंधतीच्या पदरी अखेर विश्वासघात पडलाय तर, दुसरीकडे ज्या मुलासाठी अख्खं आयुष्य अरुंधतीने वेचले आहे, त्याच मुलाने तिला तोंडघशी पाडले आहे.
अरुंधती ही नेहमीच आपल्या मुलांसाठी ढालीसारखी उभी राहिलीय. आपल्या मुलावर कुठलंही वादळ आलं तर त्या वादळाचा सामना अरुंधतीनेही केलाय आणि आपल्या मुलांना त्यातून बाहेर काढलंय. जेव्हा अंकिताने अभीशी साखरपुडा मोडला. तेव्हा अभीला सावरण्यासाठी अरुंधतीने मायेचा पदर दिला. दु:खातून सावरण्यासाठी त्याला आपला खांदा दिला आणि अलगद त्याचा हात अनघाच्या हातात दिला. अभीनेदेखील अरुंधतीच्या निर्णयाचा आदर केला. तो देखील एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे अरुंधतीच्या विचारांशी मिळतेजुळते घ्यायला लागता होता. त्यामुळे तो अनघाचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार करतो आणि ‘चट मंगनी पट ब्याह’साठी तयार होतो. पण अंकिता अभीला सोडायला काही तयार नसते. त्यामुळे अभी- अनघाच्या ऐन साखरपुड्यात अंकिता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि परत अभी साखरपुडा अर्धवट सोडून अंकिताकडे धावत जातो.