फ्रेशर मालिकेचे दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे आणि रसिका वेंगुर्लेकर यांनी केला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2017 12:27 PM
फ्रेशर मालिकेचे दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे आणि या मालिकेतील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत नुकताच ...
फ्रेशर मालिकेचे दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे आणि या मालिकेतील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत नुकताच साखरपुडा केला. अनिरुद्ध आणि रसिका गेल्या अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांच्या या नात्याविषयी अनिरुद्ध सांगतात, मी आणि रसिका कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्यावेळी आम्ही दोघेही एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचो. त्याच दरम्यान आमची ओळख झाली. कॉलेजमध्ये असताना जवळजवळ दोन-तीन वर्षं मी रसिकाच्या मागे होते. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि चक्क बस स्टॉपवर मी तिला प्रपोज केले होते. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही नात्यात आहोत. कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे देखील त्यावेळी आमचे ठरले नव्हते. मी एका कंपनीत सेल्स विभागात काम करत होतो. पण नंतर आम्ही दोघांनीही या क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले. गेल्या काही वर्षांत आम्ही दोघांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली आहे. स्ट्रगलच्या काळात एकमेकांना समजून घेतले आहे. मी निराश झालो तर ती नेहमीच माझ्या मागे खंबीर उभी राहाते. तिने आणि माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. मालिकेच्या सेटवर आम्ही दोघे केवळ दिग्दर्शक आणि कलाकार एवढेच असतो. व्यवसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात आम्ही सुवर्णमध्ये साधला आहे. रसिकाच्या अभिनयात काही खटकत असेल तर एक दिग्दर्शक म्हणून मी तिला नक्कीच सांगतो. कधी तरी माझे बोलणे तिला खटकते आणि ती मला यस सर असे बोलून निघून जाते. तिने मला सर अशी हाक मारल्यानंतर तिला राग आल्याचे माझ्या लगेचच लक्षात येते. पण दृश्य झाल्यानंतर मी एखादी गोष्ट तिला का सांगितली होती हे ती मला आवर्जून विचारते. ते कारण मी तिला समजावून सांगितल्यावर तिला नेहमीच पटते. कारण दिग्दर्शक म्हणून तुम्ही केवळ एका भागाचा नाही तर पुढील अनेक भागांचा विचार करत असता. कधीकधी मी सेटवर चिडलो असेल तर तो राग तिच्यावर निघतो. पण आपण रागाच्या भरात जवळच्या व्यक्तीवरच राग काढू शकतो ही गोष्ट ती समजून घेते.या दोघांच्या नात्याविषयी रसिका सांगते, माझ्या मालिकेचा दिग्दर्शन अनिरुद्ध आहे हे कळल्यावर सुरुवातीला तर मी खूप खूश झाले होते. तो सगळे काही माझे ऐकेल असे मला वाटले होते. मात्र मालिकेच्या सेटवर अनेक वेळा आमच्या शाब्दिक बाचाबाची होतात. पण त्यातही आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो. त्यामुळे आमच्यात वाद होत नाहीत. आम्ही दोघे एकाच क्षेत्रात असल्याने आम्हाला एखाद्या प्रोजेक्टविषयी विचारण्यात आले तर सगळ्यात पहिल्यांदा एकमेकांशी चर्चा करतो. एकाच क्षेत्रात असण्याचा आम्हाला हा सगळ्यात मोठा फायदा आहे. मी कधी चिडली असेल, मला कोणते टेन्शन असेल तर मी सगळ्यात पहिल्यांदा त्याला सांगते आणि तो नेहमीच त्यातून मार्ग काढतो.