प्रेमातील मैत्रीचे महत्त्व सांगतोय शाहीर शेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:20 PM2019-05-24T16:20:53+5:302019-05-24T16:24:53+5:30
शाहिर शेखने ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेतून आपल्या अबीरच्या व्यक्तिरेखेने त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शाहिर शेखने ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेतून आपल्या अबीरच्या व्यक्तिरेखेने त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.. अबीर (शाहीर शेख) आणि मिष्टी (रिया शर्मा) यांच्यातील वाढत्या मैत्रीमुळे प्रेक्षक खुश असले, तरी या दोघांच्या मैत्रीत आता काही अनपेक्षित वळणे येणार आहेत.
शाहीर सांगतो, “एखाद्या व्यक्तीची खूप जवळून ओळख असेल आणि त्यांच्यात मैत्री असेल, तर अशा व्यक्तीबरोबर वावरताना आपण मनाने मोकळे असतो. दोन व्यक्ती मनाने एकमेकांच्या जवळ येण्यासाठी त्यांच्यातील मैत्री हा नेहमी एक आरंभबिंदू असतो. या मालिकेत अबीर आणि मिष्टी यांच्यातील मैत्री अतिशय सुंदरतेने दर्शविली आहे. एका अगदी वेगळ्या वातावरणात ते प्रथम एकमेकांना कसे भेटतात येथपासून पुढे त्यांची मैत्री कशी वाढत जाते, त्यांच्या वडिलांसंदर्भात दोघांचा भूतकाळात साम्य असतं याचं चित्रण त्यात केलं आहे. काळ जातो, तसं त्यांच्यातील मैत्रीचं नातं अधिकच घट्ट होत जातं.
अबीर आता मिष्टीला आपला धाकटा भाऊ कुणाल याची ओळख करून देण्यासाठी मदत करीत असला, तरी हळूहळू त्याला मिष्टीबरोबर अधिकच आपलेपणा वाटू लागतो. तो तिच्याकडे आकर्षिला जातो. त्याच्या दृष्टीने मिष्टी ही एक मैत्रीण आणि एक विश्वासू व्यक्ती असते. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. अबीर आणि मिष्टी यांच्यातील या उसळत्या मैत्रीचं नातं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असून कथानक पुढे जाईल, तसं त्यांना काही सुखदाश्चर्याचे धक्केही बसणार आहेत.”