स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniors) कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कार्यक्रमात हिंदी रिऍलिटी शो गाजवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे (Vaibhav Ghuge) कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. वैभवने अनेक हिंदी रिऍलिटी शोमध्ये कॅप्टनची जबाबदारी पार पाडली आहे. हिंदीसोबत मराठीमध्येही आपल्या अनोख्या नृत्यशैलीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मी होणार सुपरस्टारच्या याआधीच्या पर्वातही त्याने कॅप्टनची जबाबदारी पार पाडली होती.
वैभवचा या झगमगत्या दुनियेतला प्रवास मात्र फारच खडतर राहिला आहे. सुरुवातीला वैभव अनेक कार्यक्रमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा. अतिशय मेहनती आणि हुशार असलेल्या वैभवला करिअरच्या सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. नृत्याची कला उपजत होतीच मात्र चंदेरी दुनियेत स्वत:ला सिद्ध करायचं असेल तर अंगी नुसती कला असून चालत नाही तर इथे दिसणंही महत्त्तवाचं असतं हे वैभव अनेक कटू अनुभवांमधून शिकला. भवन्स कॉलेजमधून शिक्षण घेत असतानाच त्याने आपलं नृत्यावरचं प्रेम जपायला सुरुवात केली.
एका बिस्किटाच्या लॉन्चसाठी कॉलेजमध्ये डान्स स्पर्धा ठेवण्यात आली होती. वैभव आणि त्याची पत्नी मेघना या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. या स्पर्धेत परफॉर्म करत असताना नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारेने वैभवचं टॅलेण्ट हेरलं आणि त्याला अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्याची संधी दिली. कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करता करता त्याने अनेक मराठी सिनेमांची कोरिओग्राफी केली. मराठीमध्ये वैभवला खूपच प्रेम मिळालं. मात्र हिंदीमध्ये काम मिळवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. काही वर्ष नैराश्येतही गेली. मात्र वैभव जिद्द हरला नाही तो प्रयत्न करत राहिला. एका हिंदी सिनेमाच्या टेक्निकलमध्ये मुख्य नृत्यक आले नव्हते आणि तिथे वैभवने परफॉर्म केलं. वैभवचं नृत्य परिक्षकांना इतकं आवडलं की त्याला हिंदी रिऍलिटी शोसाठी विचारणा झाली. आणि तिथून वैभवच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जवळपास सगळ्याच हिंदी रिऍलिटी शोमध्ये वैभवच्या तालमीत शिकलेल्या स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली आहे.
स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिसर्सचा कार्यक्रमात वैभव आता कॅप्टनच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमाविषयी सांगताना वैभव म्हणाला, ‘हे पर्व लहान मुलांचं आहे. मला लहान मुलांसोबत काम करायला खूप आवडतं. कारण या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी भरभरुन असते. ही चिमुरडी मुलं मनापासून स्वप्न पहातात. त्यांच्या मनात इर्ष्या नसते. त्यांना फक्त स्वप्नांचा पाठलाग करायचा असतो. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमात ४ ते १४ वयोगटातील मुलं या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. छोट्या दोस्तांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहून थक्क व्हायला होतं. मंचावरचं टॅलेण्ट हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.