सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे. महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते. सातत्याने वाढत जाणारी ही चुरस विजेतेपद कोण घेऊन जाणार हा प्रश्न रसिकांना पडला आहे. अजय-अतुल (Ajay-Atul) सारखी लोकप्रिय जोडी या शोचे परीक्षण करत आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे. 'मूर्ती लहान पण किर्ती महान' हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर 'माउली' म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. प्रत्येक कलाकाराचं पार्श्वगायक होण्याचं, एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला आवाज देण्याचं स्वप्न असतं. इंडियन आयडॉलच्या या मंचावर चैतन्यचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. पार्श्वगायन करण्याच्या चैतन्यच्या प्रवासाला लवकरच सुरुवात होणार आहे.
चैतन्यला दिली गाण्याची ऑफर चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चैतन्यच्या सादरीकरणाला झिंगाट परफॉर्मन्स मिळाला असून उत्तमोत्तम गाणी सादर करण्याचा प्रयत्न चैतन्याकडून होत असतो. सिनेइंडस्ट्री मधल्या एका कलाकाराने खुद्द अजय गोगावले यांना फोन करून चैतन्यला गाण्याची ऑफर दिली आहे. इंडियन आयडॉलचा मंच स्वप्नपूर्तीचा आहे आणि चैतन्यचा स्वप्नपूर्तीचा हा प्रवास आता सुरू झालाय. लवकरच रसिकांना चैतन्यच्या आवाजात एक दमदार गाणे ऐकायला मिळेल, यात शंका नाही.