बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सर्वच सदस्यांची चांगलीच चर्चा आहे. यंदाच्या सीझनमध्ये जास्तीत जास्त सोशल मीडिया स्टार सहभागी झाले आहेत. यापैकी सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची. गोलिगत धोका, झापुकझुपुक अशा डायलॉगने लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःच्या खास खेळाने आणि साध्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकतोय. सूरजने काल भाऊच्या धक्क्यावर सर्वांना भावुक केलं. जेव्हा सूरज त्याच्या बहिणीशी बोलला तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले. याशिवाय बहिणीने सूरजला त्याच्या नावाने गणपती बसवलाय, असंही सांगितलंय.
सूरजच्या नावाने गावात बाप्पाची स्थापना
काल रितेशभाऊने सगळ्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या संदेशाचे व्हिडीओ दाखवले. यावेळी सूरजला त्याच्या बहिणीचा व्हिडीओ दाखवण्यात आला. सूरजच्या बहिणीने त्याला एक खास गोष्ट सांगितली त्यामुळे त्याला अश्रू अनावर झाले. सूरजच्या गावात 'एक गाव एक गणपती' अशी योजना आहे. तरीही सूरज बिग बॉसला गेला असल्याने गावातल्या मंडळाने त्याच्या नावाने बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केलीय. सूरजची बहीण आणि सर्वांनाच त्याचा अभिमान आहे, असं त्याला सांगण्यात आलं. हे ऐकताच सूरजला अश्रू अनावर झाले.
सूरजने बहिणीला दिलं खास वचन
सूरजने बहिणीचा व्हिडीओ पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रितेशने त्याला मिठी मारुन धीर दिला. "मी ट्रॉफी जिंकून येणारच", असं म्हणत सूरजने बहिणीला वचन दिलं. सूरजने व्हिडीओ पाहिल्यावर रितेशभाऊच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पुढे रडत रडतच सूरज जागेवर जाऊन बसला. रितेशने त्याला सावरायला सांगितलं. पुढे रितेशने त्याच्याजवळ जाऊन पुन्हा त्याला मिठी मारुन धीर दिला. अशाप्रकारे सूरजने काल सर्वांनाच भावुक केलं.