सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या अध्यात्मिक मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकताच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केला. गाथा नवनाथांची या मालिकेतून नावनाथांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला. यात मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारणारा अभिनेता जयेश शेवलकरच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
जयेश शेवलकरला शुक्रवारी ६ जानेवारी रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. ही खुशखबर त्याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने बाळासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या मुलाचे स्वागत आहे.. मी वचन देतो, मी तुला एक चांगला माणूस बनवेन. मी वचन देतो, तू सुंदर आणि शांत समृद्धीने आयुष्य जगशील. त्याच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना जयेश शेवलकरने अभिनय क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले. सहाय्यक भूमिका साकारत असताना पुढे जाऊन त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. शालेय शिक्षणासोबतच त्याने सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घेतला. पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी त्याने पुणे गाठले. नाटकाची आवड असल्याने त्याने या क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. त्यासाठी ललीतकला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले.
नाटकातून रंगभूमीवरचा प्रवास सुरु असतानाच त्याला लक्ष्य मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेनंतर पुढे पसंत आहे मुलगी, स्वराज्यरक्षक संभाजी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशा मालिकांमधून सहाय्यक भूमिका साकारल्या. गाथा नावनाथांची ही त्याची प्रमुख भूमिका असलेली पहिलीच मालिका. यात तो मच्छिंद्र नाथांची भूमिका साकारत आहे. इथे ओशाळला मृत्यू या नाटिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जयेशने साकारली होती. अभिनया सोबतच जयेशने काही शॉर्टफिल्म आणि पटकथा लेखनाची कामं केलेली आहेत.