गौरवा वाधवाने 'सुपर सिस्टर्स' मालिकेसाठी 'गजनी' चित्रपटातून घेतली प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 01:12 PM2018-08-01T13:12:57+5:302018-08-01T13:13:23+5:30
'सुपर सिस्टर्स' मालिका दोन बहिणींच्या नातेसंबंधावर आधारीत आहे आणि यात शिवानी व अश्मित यांची प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे.
सोनी सब वाहिनीवरील 'सुपर सिस्टर्स' मालिकेत अश्मित ओबेरॉयची भूमिकेत अभिनेता गौरव वाधवा दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी गौरवने 'गजनी' चित्रपटात आमीर खानने साकारलेली संजय सिंघानियाकडून प्रेरणा घेतली आहे.
'सुपर सिस्टर्स' मालिका दोन बहिणींच्या नातेसंबंधावर आधारीत आहे आणि यात शिवानी व अश्मित यांची प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील भूमिकेबाबत गौरवने सांगितले की, 'या मालिकेत मी अश्मित ओबेरॉय ही व्यक्तिरेखा साकारतोय. एनआरआर अश्मित छान मजेत जगणारा माणूस आहे. त्याला हिंदी बोलता येते, पण फारसे नाही. अवघड शब्द तर नाहीच. तो छान आहे दिसायलाही आणि मनानेही. तो छान फ्लर्टिंगही करतो. पण, त्यात असभ्यपणा नसतो आणि तो काही सतत फ्लर्टिंग करत फिरत नाही.'
अश्मित ओबेरॉयची भूमिका साकारताना आमिर खानने साकारलेली संजय सिंघानिया या 'गजनी' सिनेमातील भूमिकेचा अभ्यास केल्याचे गौरवने सांगितले व पुढे म्हणाला की, 'संजय सिंघानिया फार डिसेंट आणि साधा होता. अश्मितची पार्श्वभूमीही अशीच आहे पण तो इतका साधा नाही. त्याला आनंदी रहायला, मजा करायला आवडते. त्याच्यात एक मिश्कीलपणाही आहे. त्यासाठी मी शशी कपूर यांचा त्रिशूल पाहिला. ते अश्मितसाठी अगदी योग्य आहे. हे दोन सिनेमे पाहून मी त्यांना एकत्र केले आणि त्यातून माझे असे वेगळे काम तयार केले आहे.'
'सुपर सिस्टर्स' या मालिकेची संकल्पना आगळीवेगळी आहे. ती मी पहिल्यांदा ऐकली तेव्हाच मला फार आवडली. यातली नायिका तिच्या काही गूढ रहस्यांमुळे सतत प्रेमापासून लांब राहत असते. या मालिकेचे कथातक जसजसे पुढे जाईल, हे आणखी उत्कंठा वाढवणारे ठरेल, असे गौरव वाधवा म्हणाला.