'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला.हा शो थोडा खासच होता. कार हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे उत्कृष्ट गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. तब्बल १२ वर्षानंतर हे पंचरत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला आले आणि रसिकांचेही भरघोस मनोरंजन केले.
महाअंतिम सोहळा रविवार अर्थातच 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी ओमकार कानिटकर, स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, सारंग भालके आणि गौरी गोसावी हे पाच लिटील चॅम्प्स टॉप 5 मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीने विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला 1 लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली.
तर उपविजेत्या ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालकेला प्रत्येकी 75 हजारांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली, 12 वर्षांपूर्वी आपल्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी पंचरत्न अर्थातच मु्ग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांनी या लिटील चॅम्प्सच्या पर्वात परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
या महाअंतिम सोहळ्याला गायक सुदेश भोसले, अन्नु कपूर, तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती कांदिवली, मुंबईची गौरी गोसावी.