उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी वाढत्या वीजेच्या वापरामुळे लोडशेडिंग केलं जातं. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. यावरुनच आता मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेने संताप व्यक्त केला आहे. लोडशेडिंगचा सामना करावा लागल्यानंतर गौतमीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच निवडणुका आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनांबद्दलही तिने या पोस्टमधून भाष्य केलं आहे.
गौतमी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयाबरोबरच गौतमी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी तिचं मत मांडताना दिसते. आताही उन्हाळ्यात होणाऱ्या लोड शेडिंगवरुन ती व्यक्त झाली आहे. गौतमीने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. "उन्हाळ्यात २-३ तास लाईट नसणे...मज्जा आहे नाही...क्या बात...इलेक्ट्रिसिटी देणारे!! आजच इलेक्शन चालू झाले ना", असं गौतमीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौतमीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
बहीण मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल टाकत गौतमीने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. 'माझा होशील ना' ही तिची मालिका लोकप्रिय ठरली होती. 'सारे तुझ्याच'साठी या मालिकेतून तिने पदार्पण केलं होतं. नुकतंच गौतमीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.