माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. गौतमी ही मुळची पुण्याची असून सध्या ती कामाच्या निमित्ताने मुंबईत राहाते. तिचा नुकताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात होणार होता. पण त्यातून ती थोडक्यात वाचली असे तिने नुकतेच एका व्हिडिओद्वारे सांगितले.
गौतमीने सांगितले की, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून गाडी चालवत असताना माझी गाडी अचानक कंट्रोल होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. सुदैवाने मी जास्त स्पीडमध्ये नसल्याने मी गाडी डावीकडे घेतली. पण त्याचवेळी माझ्या मागून गेलेली एक गाडी स्लीप झाली आणि तिने जागच्या जागी गंटागळ्या खालल्या. काय होतंय हे मला काहीच कळत नव्हतं. पण मी पाहिले तर त्या गाडीतील कोणालाच काहीही झालेले नव्हते. मी आयुष्यात कधीच असा अपघात इतक्या जवळून पाहिला नव्हता. त्यामुळे मी घाबरले आणि तशीच निघून फूड मॉलला गेले. तिथे जाण्याआधी मी एक्सप्रेसवेवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. त्यांनी मला 15 मिनिटांनी फोन करून सांगितले की, त्या ठिकाणी डिझेल सांडले असल्याने गाड्या स्लीप होत होत्या. पण आता आम्ही तो रस्ता व्यवस्थित केला आहे. हा अनुभव माझ्यासाठी भयानक होता.
झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.