Join us

गौतमी-क्षितीजच्या विवाहाला लोकगीतांची साथ; पहिल्यांदाच टीव्हीवर रंगतोय असा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 5:32 PM

Antarpat: सध्या अंतरपाट ही नवीन मालिका नुकतीच सुरु झाली आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितीज यांचा लग्नसोहळा रंगत आहे.

छोट्या पडद्यावर पाहायला गेलं तर आजकाल प्रत्येक सणवार, उत्सव अगदी लग्नसोहळादेखील मोठ्या दणक्यात केलं जात आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधील लग्नसोहळे टिव्हीवर गाजले आहेत. यामध्येच सध्या अंतरपाट या मालिकेतील लग्नसोहळा खास ठरत आहे.

कलर्स मराठीवर सध्या अंतरपाट ही नवीन मालिका नुकतीच सुरु झाली आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितीज यांचा लग्नसोहळा रंगत आहे. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा इतर मालिकांच्या लग्नसोहळ्यांपेक्षा वेगळा ठरतोय. कारण, पहिल्यांदाच एक लग्न चक्क लोकगीतांच्या साथीने पार पडतंय. या मालिकेत महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकसंगीताचं अनोखं दर्शन घडवण्यात येत आहे.

बेगडी दिखाव्याच्या काळात आपला लग्नसोहळा अत्यंत परंपरापूर्ण व्हावा ही गौतमीची इच्छा होती. आपल्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी गौतमी आग्रही होती आणि तिच्या इच्छेनुसार अत्यंत मराठमोळ्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडतोय. मराठी मातीतलं संगीत आणि लोकपरंपरेच्या साथीनं हा लग्नसोहळा सजला आहे. 

आजकाल लग्नसोहळ्यात चकचकीत रोषणाईने सजवलेले हॉल, ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण या सगळ्या झगमगाटात महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव बाजूलाच पडतेय. पण महाराष्ट्राच्या या गतवैभवाला ‘अंतरपाट’ मालिका या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उजाळा देत आहे. 

क्षितीज आणि गौतमीच्या लग्नात कोणताही दिखावा न करता लोककलेच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्याचं मनोरंजन करण्यात आलं आहे. 'दादला नको गं बाई' हे भारूड, 'धरिला पंढरीचा चोर'सारख्या गीतांचा समावेश आहे. शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.  दरम्यान, अंतरपाट या मालिकेत रश्मी अनपट आणि अक्षय ढगे ही जोडी मुख्य भूमिका साकारत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररश्मी अनपट