दिवाळी सणांची वाट सगळेच मोठ्या उत्साहाने बघत असतात. सेलिब्रेटी ही यात मागे नाही. ते ही शूटिंगमधून वेळ काढून आपल्या कुटुंबीयसोबत आणि मित्रपरिवारासोबत दिवाळी सेलिब्रेट करतात.
शिवानी बावकर, अभिनेत्री (लागिरं झालं जी) दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे आणि या सणाची मी आतुरतेने वाट बघते. नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी आम्ही नेहमी लवकर उठतो. मला एक धाकटी बहीण आहे त्यामुळे आमच्या दोघींमध्ये स्पर्धा लागते कि सर्वात आधी कोण उठणार आणि कोण पहिली अंघोळ करणार? लहानपणी आम्ही लवकर उठून तयार होऊन बाहेर फटाके फोडायला जायचो पण आता आम्ही फटाके फोडत नाही. दरवर्षी दिवाळीमध्ये घरी चविष्ट फराळ केला जातो. माझा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे कानवले, तसेच माझी आई चिवडा देखील खूप छान बनवते. जर कधी फराळ बनवणं शक्य नाही झालं तर आम्ही गृहिणीविकास केंद्राकडून फराळ घेतो. त्यानिमित्ताने आपण गृहिणींना व त्यांच्या लघुउद्योगाला प्रोत्साहन देतो. मला असं वाटतं कि ज्यांना कामामुळे, वेळेअभावी किंवा वयोमानानुसार फराळ करायला जमत नाही त्यांनी अशा महिलांकडून फराळ विकत घ्यावा म्हणजे एका अर्थाने आपण सामाजिक बांधिलकी जपत त्यांची दिवाळी दिवाळी देखील खऱ्या अर्थाने आनंदी बनवतो. फटाके मी आणि माझी बहीण लहानपणी खूप उडवायचो पण जसजसं आम्ही मोठे झालो आणि पर्यावरणाचं महत्व आम्हाला कळलं तेव्हापासून आम्ही फटाके फोडणं बंद केलं. दरवर्षी दिवाळीची खरेदी ही देखील तितक्याच उत्साहाने केली जाते. फक्त आजकाल खरेदी ऑनलाईन शॉपिंगमुळे खूप सोयीस्कर झाली आहे. तसेच दिवाळीच्या शुभेच्छा आपण एक मेसेज करून देतो त्यापेक्षा आपण एकमेकांना कॉल करून किंवा भेटून द्याव्या असं मला वाटतं.
गायत्री दातार, अभिनेत्री (तुला पाहते रे) दिवाळी म्हणजे दिव्यांचा, रोषणाईचा सण, ज्या सणाची मी आतुरतेने वाट बघते. या सणाच्यावेळी घरी खूप मंगलमय वातावरण असतं. पाहुणे आणि नातेवाईकांची घरी रेलचेल असते. कंदील बनवणं, पणत्या रंगवणं, फराळ बनवणं ही सर्व तयारी दिवाळीच्याआधी आमच्या घरी दरवर्षी होते. मला रांगोळी काढायला आवडते, त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी मी दाराबाहेर रांगोळी काढते. फटाके उडवायला मला स्वतःला नाही आवडत त्यामुळे मी फटाके उडवत नाही आणि कोणी उडवत असेल तर मी माझ्यापरीने त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. फटाक्यांच्या धुरात पैसे खर्च करण्यापेक्षा आपण सामाजिक बांधिलकी जपत ते कुठल्या चांगल्या कामासाठी वापरले तर ते सत्कर्णी लागतील असं मला वाटतं. दिवाळीमध्ये फराळ आणि गोड धोड खाण्याची चंगळ असते. मी आईला लाडू वळायला तसेच इतर पदार्थ बनवायला मदत करते. दिवाळी ही सगळ्यांचीच असते त्यामुळे आमच्या घरी काम करायला ज्या बायका येतात तसेच बिल्डिंगचे वॉचमन काका यांना आम्ही दिवाळीच्या भेटवस्तू देतो. माझ्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.