Join us

‘तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार...’, अभिनेत्री गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:41 AM

‘गंदी बात’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ (Gehana Vasisth ) हिने टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

‘गंदी बात’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ (Gehana Vasisth ) हिने टेलिव्हिजनची क्वीन एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. एकता कपूरमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार आलेत,असा धक्कादायक दावा गहनाने केला आहे. (Gehana Vasisth makes serious allegations against Ekta Kapoor)

गहनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत एकता कपूरवर अनेक आरोप केले आहे. ‘लॉक अप’ या शोसाठी माझ्याशी संपर्क करण्यात आला होता. माझं ऑडिशनही झालं होतं. मानधनही ठरलं. ‘लॉक अप’च्या निर्मात्यांनी करारही केला. पण ऐनवेळी मला शोमध्ये बोलावलं गेलं नाही. या शोसाठी मी माझा बराच वेळ घालवला, मला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला,असा गहनाचा प्रमुख आरोप आहे. याच आरोपाच्या निमित्ताने गहनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, ‘अनेक जण माझे हे आरोप पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत आहेत. पण यात काहीही तथ्य नाही. मला यामुळे काहीही फायदा होणार नाहीये. या आरोपांमुळे झालंच तर माझं नुकसानचं होईल. कारण तुम्ही तुमचं तोंड उघडलं की, इंडस्ट्रीत तुम्हाला काम मिळणं बंद होतं. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत हे सुरू आहे. मी जे काही आरोप केलेत, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत.’

गहना म्हणाली....डिसेंबरमध्ये मला बालाजी प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला. आम्ही एक रिअ‍ॅलिटी शो करतोय. याची थीम बिग बॉससारखी आहे, असं सगळं ते बोलले. मी आधी नकार दिला. पण त्यांनी मला बोलून चर्चा करून असं सांगितलं. मी राजी झाले. मी गेले. मला सगळं समजवून सांगण्यात आलं. मग पैशांबद्दल बोलणं झालं. दोन दिवसानंतर मला फोन आला. मी या शोसाठी सिलेक्ट आहे, हे मला माहित होतं. कारण जेलची थीम होती आणि भूतकाळात मी याचा अनुभव घेतला होता. फोनवर त्यांनी मला पैशांबद्दलच्या अपेक्षा विचारल्या. दरदिवशी 50 हजारावर मी संमती दर्शवली. यानंतर दोन दिवसांनी पुन्हा फोन आला. आम्ही आठवड्याला 1.50 लाख देऊ. राजी असाल तर बोला नाहीतर सोडा, असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यालाही होकार दिला.

दुसऱ्यादिवशी मला कन्फर्मेशन मेल आला. काहीदिवसानंतर आमचा झूम कॉल झाला.  नंतर काही दिवसानंतर करार झाला. माझ्या मेडिकल टेस्ट झाल्या. यानंतर शो सुरु होणार असताना मला फोन आला. आम्ही तुम्हाला दुसऱ्या आठवड्यात आत पाठवू, असं ते मला म्हणाले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. कारण या शोसाठी मी सगळी तयारी केली होती. यादरम्यान आलेल्या ऑफर नाकारल्या होत्या. पहिला आठवडा संपला, दुसरा संपला, तिसरा संपला, चौथा संपला, पण मला शोमध्ये पाठवलं गेलं नाही आणि अचानक आम्ही तुमच्यासोबतचा करार टर्मिनेट करतोय, असं मला सांगण्यात आलं. गेल्या चार महिन्यांपासून मी घरी बसले आहे. मला एकता कपूरकडून काहीही नकोय.  मलाच तिच्यासारख्या बाईसोबत काम करायचं नाहीये. जी दिलेला शब्द पाळत नाही, तिच्यासोबत मी अजिबात काम करणार नाही. इंडस्ट्रीत अनेक लोक आत्महत्या करतात. कारण त्यांच्याकडे काम नसतात. लोक त्यांना काम देण्याच्या नावाखाली मूर्ख बनवत असतात. खरं कोणालाच माहित नसतं. माझ्या मनातही आत्महत्येचे विचार आलेत. पण त्याने काय बदलणार?  मी हे सगळं पब्लिसिटीसाठी करतेय, असं म्हणणा-यांना एकच सांगेल की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. माझ्यासोबत चुकीचं झालं, एवढंच मला सांगायचं आहे.

टॅग्स :एकता कपूरटेलिव्हिजन