सहजसुंदर अभिनय आणि प्रत्येक भूमिका ठसकेबाजपणे सादर करायची कसब असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नयना आपटे (nayana apte). गेल्या कित्येक वर्षांपासून त्या मराठी कलाविश्वावर राज्य करत आहेत. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या प्रत्येक माध्यमामध्ये त्यांची छाप सोडली आहे. सध्या त्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहेत. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बदलता काळ आणि त्यानुसार, स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावायची लोप पावत चाललेली पद्धत यावर भाष्य केलं आहे.
नयना आपटे यांनी नुकतीच 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल, पर्सनल आणि एकंदरीतच सगळ्याच समाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं. यात कुंकू न लावणाऱ्या स्त्रियांना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या नयना आपटे?
कपाळाला हल्ली कुंकू लावलं जात नाही. कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून तयार केली जायची.आता टिकली आहे. आता सौभाग्यवती बाथरूम असते, बाई असते की नाही माहीत नाही. कुंकू लावणं हा एक योगाचा प्रकार आहे. कुंकू नेहमी तर्जनीने लावलं जातं. आता तर्जनीने का तर कपाळावर ज्या भागात कुंकू लावतात तिथे कुंडली जागृत असते. आपल्या मेंदूच्या मध्यभागेची नस तिथे जोडली आहे. रोजच्या रोज त्या भागावर मसाज केला गेला तर वायब्रेशन होऊन तुमचा मेंदू अलर्ट होतो. हे कुंकू लावण्यामागचं शास्त्र आहे. पण हे शास्त्र कोणाला पटत नाही किंवा त्याविषयी कोणी प्रश्नही विचारत नाही. किंवा, ते शास्त्र नीट समजून सांगता येत नाही. त्यामुळे त्यात काय मोठं असं म्हणून कुंकू लावलं जात नाही, असं नयना आपटे म्हणाल्या.
दरम्यान, नयना आपटे यांनी मराठी कलाविश्वात अनेक गाजलेल्या नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्या हिंदी मालिकांमध्येही झळकल्या आहेत.