Join us

रात्री अडीच वाजता ज्ञानदाने सोडलं होतं घर; 'ठिपक्यांची रांगोळी' फेम 'या' अभिनेत्रीने दिला होता आसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 4:00 PM

Dnyanda ramtirthkar: ज्ञानदावर का आली होती घर सोडायची वेळ? अभिनेत्रीने सांगितला किस्सा

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanda ramtirthkar). उत्तम अभिनयकौशल्य आणि मस्तीखोर स्वभाव यांच्या जोरावर तिने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. पडद्यावर बिनधास्तपणे वावरणाऱ्या ज्ञानदाने एकदा चक्क रात्री अडीच वाजता तिचं राहतं घर सोडलं होतं. यावेळी 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिला आसरा दिला होता.

 अलिकडेच ज्ञानदा आणि अभिनेत्री नम्रता प्रधान (Namrata pradhan) या दोघींनी 'लोकमत'च्या 'आपली यारी' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघींनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितलं. इतकंच नाही तर ज्ञानदाने एकदा तिचं घर सोडून मध्यरात्री ती नम्रताच्या घरी गेली होती. जवळपास ८-१० दिवस ज्ञानदा नम्रताच्याच घरी रहात होती. या मुलाखतीमध्ये ज्ञानदाने तिचं राहतं घर का सोडलं होतं? या मागचं कारणही तिने सांगितलं आहे.

"ज्यावेळी सिरीअल सुरु होती त्यावेळी मी आणि नमा अगदी एकमेकींपासून ७-८ मिनिटांच्या अंतरावर रहायचो. मला पावसाची भीती वाटते आणि त्या दिवशी इतका जोरात पाऊस पडत होता. तेव्हा रात्री अडीच वाजता मी नमाच्या घरी गेले.  जवळपास आठवडाभर मी तिच्या घरी राहिले. जोपर्यंत पाऊस शांत होत नाही तोपर्यंत", असं ज्ञानदाने सांगितलं. ज्ञानदाचीच री पुढे ओढत नम्रतानेही आणखी एक किस्सा सांगितला.

"ज्ञानदा पहिल्यांदा एकदा राहून गेली. त्यानंतर पुन्हा अशीच जोरदार वीज कडाडली. त्यावेळी बघू घरी कोण आहे सोबत नाही तर मी पुन्हा येते असं तिने मला सांगितलं. झोपेत असल्यामुळे मला काही फारसं कळलं नाही. पण, तिने रात्री अडीच वाजता फोन केला आणि मी तुझ्या घरी येतीये असं सांगितलं आणि ती खरंच रात्रीची एकटी आली," असं नम्रता म्हणाली.

दरम्यान, नम्रता आणि ज्ञानदा यांची खूप घट्ट मैत्री असून त्यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत. या दोघींची मैत्री ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवरही पाहायला मिळाली आहे. या मालिकेत ज्ञानदाने अपूर्वा ही भूमिका साकारली होती. तर, नम्रताने सुमी ही भूमिका साकारली होती. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार