Join us  

‘गेला उडत’ एक व्यावसायिक पठडीतला प्रायोगिक ‘खेळ’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 2:32 PM

पहिली घंटा झाली. गोष्टीची सुरुवात झाली. गोष्ट तशी ओळखीची. जगभरात ठरलेली. एक असतो गरीबडा. त्याचा असतो एक मित्र. या ...

पहिली घंटा झाली. गोष्टीची सुरुवात झाली. गोष्ट तशी ओळखीची. जगभरात ठरलेली. एक असतो गरीबडा. त्याचा असतो एक मित्र. या मित्रा शिवाय त्याचं ऐकणार ते कोण? गरीबड्याला कोणी एक लाथ मारली कि ते रडतरडत त्या मित्राकडे जातं. मित्र त्याला आंजरतो गोंजारतो. त्याची खोटी खोटी समजूत काढतो. पण मनात रोख असतोच. मित्राला त्या गरीबड्याची कीव हि येत असते आणि राग हि. राग आणि कीव दोन्ही हि गरीबड्याच्या दुबळेपणावरंच. कधी ना कधी त्या मित्राच्या सहनशीलतेचा स्फोट हा होणार असतोच. एकदा तो झाला कि मग गरीबड्या कोण? आणि मित्र कोण? हे कळेणासं होतं. हि गोष्ट एका विनोदी नाटकाची? ते हि केदार शिंदेंच्या? ज्यात सिद्धार्थ जाधव देखील आहे.

      हो. कारण “मुळात” एखादी गोष्ट विनोदी किंवा सस्पेन्स किंवा अजूनकाही अशी नसतेच. एखादा लेखक-दिग्दर्शक त्या गोष्टीकडे, त्या नाटकाच्या आधारस्तंभाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो यावर सारं निर्भर असतं. केदार शिंदे ज्या ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते/आहेत त्या सगळ्या “गेला उडत” मध्ये नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही. तरीही “गेला उडत” मधली नाविन्यपूर्णता हि अवाक करण्याइतपत ठासून भरली आहे. नाटक हा एक खेळ आहे. इंग्रजीत आपण नाटकाला “प्ले” असं म्हणतो. ते उगाच नाही. शेकडाभर माणसं एका बंधिस्त ठिकाणी एकत्र येतात, काळोख केला जातो, डजनभर माणसं समोर एक खोटाखोटा संसार मांडतात आणि ति शेकडाभर माणसं हसतात, रडतात, उत्तेजित होतात आणि कधीकधी कंटाळून निघून हि जातात. तुम्ही म्हणाल असंकसं? धगधगता वास्तव मांडणारी मंडळी आहेत ना? यावर स्पष्टीकरण इतकंच कि तो खेळ अनफीलटर्ड असतो. आयुष्यावरचा असला तरी तो खेळंच असतो. अर्थात विनोदी किंवा दुसऱ्या टोकावर असलेली ‘आळेकरी’ पॅटर्न नाटकातला हा खेळ जरा जास्त जोपासते. बरीचशी विनोदी नाटकं हा खेळ मांडताना नाटकाचा खेळ-खंडोबा करतात ते सोडा, पण एकदा कि एका लोकमान्य विनोदी नाटकाचा हा खेळ जुळून आला कि त्यासारखं दुसरं सुख नाही. 

       निखळ मनोरंजनाची इतकी परिपक्व अनुभूती शोधून सापडायची नाही. खेळ म्हटला कि त्यात खेळाडू आलेच. डॉक्टर लागू एकदा म्हणाले होते, नट हा उत्तम अॅथलीट असावा लागतो. हो कारण ‘गेला उडत’ मधली सगळी मंडळी जो काही धुमाकूळ अडीच तास घालतात ते अॅथलीटंच करू शकतात. महाविद्यालयांमधले एकांकिकांचे दिग्दर्शक वगैरे याचसाठी त्या तरुणांवर बेंबीच्या देठापासून ओरडत असावेत. 

       नाटक नाविन्यपूर्ण आहे म्हणजे नेमकं  कस? ते असं, कि हा विनोद त्याच्याच वरवरच्या किंचीत  उथळ आवरणा च्या आत जाऊ पाहतो. केवळ पंचेस बसण्याच्या पलीकडे तो जातो. मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे नाटकातला 'खेळ' बाजी मारतो. तो नेमका कसा? यासाठी तुम्हाला नाटक पहावं लागेल. नाटकात सुपरहीरो, सुपर गाणी, नेपथ्याचा पुरेपूर केलेला वापर आहेच. याच सोबत लेखक-दिग्दर्शकाने प्रत्येक पात्राचं/खेळाडूचं नाटकात आणि खेळातलं अस्तित्व पूर्णतः सार्थकी  लावलं आहे.       

        विनोदी किंवा अब्सर्ड नाटकांमध्ये चौथी भिंत तोडून निर्माण होणारे विनोद नवीन नाहीत. अगदी गिरीश कार्नाडांपासून मकरंद साठेंपर्यंत सगळ्यांनी ते केले आहेत. पण इथे फरक पडतो तो कलावंतांमुळे. १०० वेळा झालेला पंचसुद्धा १०१व्या खेपेला ‘चालू’ शकतो मात्र तो चालवता आला पाहिजे. नाटक हे नाटककाराबरोबरंच तितक्याच अंशी नटाचं/नटांचं असतं. ‘गेला उडत’ मधला नटसंच हि या नाटकाची तिच्या नाविन्यपूर्णते इतकीच जमेची बाजू. आणि ते देखील शुभारंभाच्या प्रयोगात. सिद्धू रंगमंचावर काय कमाल करू शकतो हे त्याने पुन्हा सिद्धं केलंय. इतरांचं काम देखिल तितकंच भक्कम झालंय, विशेषतः गणेश जाधव. प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकाला त्याला गुंतून ठेवेल असा आशय या नाटकात आहे. अगदी तुमच्या घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांना देखील हे नाटक खेळवून ठेवणारं आहे. इतकंच नव्हे तर विनोदी नाटकं/एकांकिका लिहू पाहणाऱ्या नवोदित लेखकांसाठी तर हे कार्यशाळा म्हणून लागू पडेल.