कॉमेडियन कपिल शर्माने सोशल मीडियावर गो इंडिगोच्या ढिसाळ कारभाराविरोधात राग व्यक्त केला आहे. कपिल शर्मासोबत १८० प्रवासी गेले दीड तास विमानातच बसून होते, परंतू पायलट काही आला नव्हता. यावरून पुन्हा हे १८० प्रवासी तुमच्या विमानसेवेचे तिकीट काढतील का असा सवाल कपिलने केला आहे.
विमानात बसविण्यापूर्वी कपिल शर्मासह प्रवाशांना ५० मिनिटे बसमध्येच बसविण्यात आले होते. यानंतर विमानात बसविण्यात आले. रात्री ८ वाजताचा विमान उड्डाणाची वेळ होती. परंतू, ९.२० झाले तरी पायलट कॉकपीटमध्ये आला नव्हता. यात कहर म्हणजे गो इंडिगोने दुसरे विमान देतो असे सांगून या सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि पुन्हा टर्मिनलवर पाठविले आहे. यामुळे पुन्हा या प्रवाशांना सिक्युरिटी चेकमधून जावे लागले आहे.
गो इंडिगोचे क्रू मेंबर प्रवाशांना पायलट वाहतूक कोंडीत अडकल्याचे कारण देत होते. कपिल शर्माने दोन ट्विट केली आहेत. एका ट्विटमध्ये प्रवासी विमानातून उतरतानाचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. गो इंडिगोकडून कपिलच्या या तक्रारीवर अद्याप काही खुलासा आलेला नाहीय.