महाराष्ट्रात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले होते. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरण गोवा, हैद्राबाद, दमण अशा विविध ठिकाणी सुरू आहे.
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सध्या चित्रीकरण गोव्यातील मडगांव येथे सुरू आहे. पण आता गोव्यात देखील रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गोव्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाला अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांचा विरोध आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नुकताच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन चांगलाच गोंधळ घातला.
मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये चित्रीकरण सुरू असताना विजय सरदेसाई यांनी विरोध केला. मडगाव आणि फातोर्डा या परिसरात रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विजय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून येथे कोरोनाचे नियम तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कार्यक्रमाच्या निर्मिती संस्थेकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर अखेर गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मध्यस्ती केल्यानंतर हा तणाव निवळल्याचं सांगण्यात येत आहे.