कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी या मालिकेत देवींसाठी पृथ्वीवर येऊन भवानीशंकर रूपात राहिलेले महादेव आणि आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारे बालगणेश आणि अशोकसुंदरी हा गोष्टीचा टप्पा अंतिम चरणात आहे. हा टप्पा कसा उलगडणार,देवींना महादेवांचे सत्य कसे कळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
बालगणेश आणि अशोकसुंदरीने, देवींसाठी तुळजापुरात वाड्याची निर्मिती करण्याची विनंती करण्यामागची प्रेरणा आईवडिलांना एकत्र आणावी हीच होती. या वाड्याची निर्मिती त्यापाठोपाठ कल्लोळ तीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मिती मागची गोष्ट प्रेक्षकासमोर उलगडत असतानाच देवीला भवानीशंकर यांच्या रूपाबद्दल येणारी शंका आणि अखेर महादेवांचे खरे रूप नाट्यमयरित्या उघड होणे हा अत्यंत रोमहर्षक कथाभाग गुरुवार २० फेब्रुवारी ते शनिवार २२ फेब्रुवारीच्या भागांमध्ये दररोज रात्री नऊ वाजता उलगडणार आहे, याचा कळस साध्य येत्या रविवार २३ फेब्रुवारीच्या महाएपिसोडमध्ये होणार असून महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडणार आहे आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना दिसणार आहे.