अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हि सगळी पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही पात्रं आपल्यापैकीच एक असल्याचे त्यांना वाटू लागले आहे.
आता या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे. राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. त्यांचा हा लाडोबा बाळकृष्णासारखाच लाघवी आणि खोडकर आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवात वाड्यावर खास भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच लाडू बाळकृष्णचा अवतार धारण करणार आहे. घरातील संपूर्ण वातावरण भजनाच्या गजरात भक्तीमय होणार आहे. राणा आणि अंजली श्रीकृष्णाच्या पूजेची जय्यत तयारी करत आहेत. तसेच पूजेनंतर लाडू दहीहंडी फोडणार आहे. गोकुळाष्टमी हा सण गायकवाडांच्या वाड्यात अत्यंत जोशात आणि आनंदात साजरा होणार आहे.
गोकुळाष्टमीचा हा उत्सव प्रेक्षकांना तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील लाडू प्रेक्षकांना बाळकृष्णाच्या भूमिकेत देखील भावेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.