सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या गोव्यातील शूटिंगदरम्यान गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोंधळ घातला आणि शूटिंगला विरोध केला होता. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. त्यामुळे आता गोव्यात सुरू असलेले मालिकांचे शूटिंग अडचणीत सापडले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गायक आणि सूर नवा ध्यास नवाचे परीक्षक अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
गायक अवधूत गुप्ते याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो शेअर करत लिहिले की, गुड बाय गोवा! आठवणी आठवत राहिल्याबद्दल धन्यवाद .. आणि विसरण्यासाठी !
गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरूवारी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या सेटवर येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये चित्रीकरण सुरू असताना विजय सरदेसाई यांनी विरोध केला होता. मडगाव आणि फातोर्डा या परिसरात रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.विजय यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून येथे कोरोनाचे नियम तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचे सध्या गोव्यात शूटिंग सुरू होते. मात्र आता या मालिकांचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे.