वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहे. यामध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. लॉकडाऊन दरम्यान मालिकांचं शूटिंग बंद आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेल्या मालिका, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'तुला पाहते रे', 'स्वराज्य रक्षक संभाजी' आणि 'जय मल्हार' या तीन मालिका पुन्हा एकदा सुरु होत आहेत.
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका ३० मार्चपासून सायंकाळी ४ वाजता प्रसारीत होत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर ही मालिका साकारण्यात आली आहे.
संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील घरोघरी पोहचला. अनेकदा ही मालिका दबावामुळे बंद पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अनेक शिवप्रेमींनी ही मालिका सुरुच राहावी याची आग्रही मागणी केली होती. संभाजी महाराजांना झालेल्या अटकेमुळे रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच मालिकेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं.
'तुला पाहते रे' ही मालिका ६ एप्रिलपासून सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तुला पाहते रे मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.
या मालिकेतील ईशा निमकर व विक्रांत सरंजामे आणि इतर पात्रांवर रसिकांना भरभरून प्रेम केलं. वर्षभरात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आजही या मालिकेतील कलाकारांना चाहते मिस करत आहेत. त्यांना आता ही मालिका पुन्हा पाहता येणार आहे.
तर संध्याकाळी ६ वाजता 'जय मल्हार' मालिका झी मराठीवर प्रदर्शित होणार आहे. छोट्या पडद्यावर जय मल्हार ही मालिका तुफान गाजली होती.
मालिकेतील सर्वच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले होते. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर या तीनही कलाकारांना या मालिकेनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रेम मिळवून दिलं. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरात लोकप्रिय ठरली होती.