Join us  

मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 8:02 PM

Mrunal Dusanis : २०१६ साली लग्न केल्यानंतर मृणाल दुसानीस परदेशात स्थायिक झाली आणि ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. मात्र आता ती अलिकडेच भारतात परतली आहे.

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis). तिने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेत ती दिसली. कमी मालिकांमध्ये काम करूनदेखील तिने रसिकांच्या मनात घर केले. २०१६ साली लग्न केल्यानंतर ती परदेशात स्थायिक झाली आणि ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. मात्र आता ती अलिकडेच भारतात परतली आहे. हो हे खरंय. तिच्या चाहत्यांसाठी खुशखबरदेखील आहे. आता ती भारतात वास्तव्यास असून ती लवकरच काम करताना दिसणार आहे. याबद्दल तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

मृणाल दुसानीसने लोकमत फिल्मीच्या घर, सुट्टी, बरंच काही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने करिअर, लग्न आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. भारतात परतल्यानंतर तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ती कमबॅक करणार का, याबद्दल ती म्हणाली की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की, मी चांगल्या कामाच्या प्रतीक्षेत आहे आणि तशी कामे माझ्याकडे येत आहेत. जे छान असेल आणि योग्य असेल ते मी नक्कीच करेन. अर्थात मला मालिकेतूनच सुरूवात करायला आवडेल. कारण मालिकेतून तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहचता. तुम्ही अनेकांपर्यंत एकावेळी पोहचता. त्यामुळे मला मालिकेत काम करायचे आहे. मालिकेनंतर आता मला नाटकात काम करायचे आहे. कारण माझी सुरूवात नाटकापासून झाली आहे. 

मृणाल दुसानीसने आतापर्यंत सालस, सोज्वळ अशा सून, पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिला आतापर्यंत निगेटिव्ह भूमिकेची ऑफर आली होती का, असे विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, माझी तर खूप इच्छा आहे की कोणीतरी निगेटिव्ह रोल द्यावा. मला निगेटिव्ह भूमिकेसाठी विचारलेच जात नाही. मी एकाकडे निगेटिव्ह भूमिका मागितली होती, पण त्यांनी हे शक्यच नाही असे सांगितले होते. कारण तुमचा चेहरा सालस, सोज्वळ असेल तर लोक पण लगेच स्वीकारत नाहीत. येत्या ३ ते ४ महिन्यात मी प्रेक्षकांना नक्कीच काम करताना दिसेन.

टॅग्स :मृणाल दुसानीस