आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमके काय घेतले पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसे व्यक्त व्हावे हे आतापर्यंत सोनी मराठीवरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय या मालिकेत दाखवणार आहे आणि तो विषय म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’. पार्थच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग आणि त्यामुळे हर्षदाच्या भूतकाळातील जागी झालेली कटू आठवण या कथानकावर आधारित एक एपिसोड प्रत्येकाच्या भल्यासाठी, सुरक्षिततेसाठी असणार आहे. एकेदिवशी पार्थ शाळेतून चॉकलेट खात खात घरी येतो आणि तो सर्वांना सांगतो की त्याच्या एका मित्राच्या वडीलांनी तो नको म्हणत असतानाही आग्रहाने त्याच्या हातात चॉकलेट ठेवले. तुलिका याकडे बऱ्यापैकी कौतुकाने बघते की पार्थ कसा सगळ्यांचा लाडोबा आहे आणि कसे प्रत्येकाला त्याचे लाड करावेसे वाटतात. पण याकडे हर्षदाचा बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. कारण पार्थच्या या प्रसंगामुळे हर्षदाला तिच्या भूतकाळातील एक प्रसंग आठवतो जो तिला अस्वस्थ करुन टाकतो. कधीही आठवला जाऊ नये असा प्रसंग हर्षदाला आठवतो आणि तिच्या मनाची घालमेल सुरु होते. अस्वस्थता घालवून टाकण्यासाठी नेहमीच उपयोगीचा ठरतो तो म्हणजे ‘संवाद’.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 1:54 PM