अभिनेता गोविंदाने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्याच्या क्षेत्रातील त्याचे योगदान हे अतुलनीय आहे. बॉलीवूडचा हीरो नं. 1 असलेल्या या अभिनेत्याने नवनव्या नर्तक कलाकारांची नेहमीच प्रशंसा केली असून ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स+4’ या कार्यक्रमात अलीकडेच तो सेलिब्रिटी अतिथी म्हणून सहभागी झाला असताना त्याची चुणूक दिसून आली. गोविंदाने या कार्यक्रमातील चेतन साळुंखे या स्पर्धकाच्या कामगिरीचा आढावा घेतला असून त्याच्या पॉपिंग नृत्यावर गोविंदा खुश झाला आहे.
गोविंदाने नृत्यातील कौशल्य स्वत:चे स्वत:च प्राप्त केले होते. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला नृत्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमता आला नाही; पण तरीही त्याने नृत्यात नैपुण्य हस्तगत करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. त्यामुळेच या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर त्याने आपली एक संस्मरणीय छाप उमटवून देण्याचा निर्धार केला. नृत्याबद्दल प्रेम असलेल्या गोविंदाने चेतनने आपली कामगिरी पार पाडल्यावर त्याला नृत्यास आवश्यक असणाऱ्या वस्तूंची (उदाहरणार्थ, बूट, कॅप, हेडफोन्स, टी-शर्ट, स्पीकर्स वगैरे) एक पिशवीच भेट दिली. यापूर्वी नृत्य शिकताना येणाऱ्या अडचणी आणि आपल्या सामान्य आर्थिक परिस्थितीबद्दल चेतनला बोलताना गोविंदाने ऐकले होते. तुटपुंजी साधने आणि हलाखीची परिस्थिती असतानाही चेतनने नामवंत नर्तकांचे व्हिडिओ पाहिले आणि नृत्याचा सरावही कायम राखला, असे गोविंदा म्हणाला. त्याने पुढे सांगितले की, नृत्याबद्दल असलेल्या त्याच्या अढळ निष्ठेमुळेच चेतनला आपले स्वप्न साकारण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच त्याच्या या गुणांची कदर करण्याचा सर्वात मोठा आणि सोपा मार्ग म्हणजे त्याला नृत्यविषयक साधने उपलब्ध करून देणे हाच होता.