बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता अशी गोविंदाची ओळख. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्या अभिनेत्यावर रसिक आजही जीवापाड प्रेम करतात अशा मोजक्या अभिनेत्यांमध्ये गोविंदाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचाच बोलबाला होता. त्यामुळंच की काय त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा नंबर वन अशी उपाधी रसिकांनी देऊन टाकली. त्याच्या या अभिनयाच्या जोरावर त्याला विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.
गोविंदा रिल लाइफमध्ये जसा आहे किंबहुना त्याहून अधिक चांगला माणूस तो रिअल लाइफमध्येही आहे. याची प्रचितीही वारंवार येते. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचं रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. तसेच हिंदी रसिकच नाहीतर मराठी रसिकही त्याच्या तितकेच प्रेम करतात. इतकंच नाही तर वेळोवेळी त्याचा मराठी बाणाही पाहायला मिळतो.
पुन्हा एकदा याचीच प्रचिती आली. नुकतंच गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ या सोहळ्यात उपस्थिती लावली होती. त्याची धमाकेदार एंट्री एका जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने झाली. आता गोविंदा मंचावर आल्यावर त्याच्यासोबत डान्स करण्याचा मोह कलाकारांना देखील आवरला नाही.या मंचावर झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच मन झालं बाजींद मधली कृष्णा, मन उडु उडु झालं मधील दिपू, येऊ कशी तशी मी नांदायला मधील स्वीटू, माझी तुझी रेशीमगाठ मधील नेहा आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मधील अदिती या सगळ्याजणी गोविंदासोबत थिरकण्यासाठी सज्ज झाल्या. इतकंच नव्हे तर सगळ्यांची लाडकी परी देखील गोविंदासोबत थिरकण्याचा मोह आवरू शकली नाही. गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ च्या मंचावर मन उडु उडु झालं या मालिकेच्या शीर्षक गीतावर ताल धरला आणि स्वतःच्या स्टाईलमध्ये परफॉर्म करून सगळ्यांना नाचायला भाग पाडलं.गोविंदाच्या हजेरीने या सोहळ्याला चारचाँद लागले होते.