आज ९ एप्रिलपासून हिंदू नववर्षाला सुरुवात होत आहे. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा करत नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी शोभा यात्राही काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये दरवर्षी कलाकारही सहभागी होताना दिसतात.
यंदाही शोभायात्रेत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार यंदा शोभायात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळाले. गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवली येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेत हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी इशा डे, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव यांच्याबरोबरच सोनी मराठीवरील इतर मराठी कलाकारही उपस्थित होते. या शोभायात्रेसाठी त्यांनी खास मराठमोळा पोशाख केल्याचं पाहायला मिळालं. शोभायात्रेत सहभागी होत कलाकारांनी प्रेक्षकांना नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रा या खास आकर्षण असतं. शोभायात्रेत पारंपरिक साज करून अनेक नागरिक सहभाग घेतात. दरवर्षी तरुणांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतो. या शोभायात्रेत ढोलताशा पथक, चित्ररथ, साहसी खेळ यांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. तर मोठमोठ्या रांगोळ्याही काढल्या जातात.