मन गुंतवून ठेवणारे कथानक आणि शब्बीर अहलुवालिया (अभि), सृती झा (प्रज्ञा), पूजा बॅनर्जी (रिहा), कृष्णा कौल (रणबीर) आणि मुग्धा चापेकर (प्राची) या नामवंत अभिनेत्यांच्या कामगिरीने ‘कुमकुम भाग्य’ या प्राइम टाइममधील मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. मालिकेच्या कथानकाला मिळणार्या कलाटण्यांमुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात सदैव उत्कंठा असते.
अलीकडेच या मालिकेच्या कथानकाचा काळ एका महिन्याने पुढे नेण्यात आल्याने मालिकेत नवा अध्याय सुरू झाला आहे. या कालांतरानंतर प्रेक्षकांना दिसले की प्राची आणि रणबीर हे विभक्त झाले असून पल्लवीने रणबीरचे लग्न रिहाशी लावून दिले आहे. आता प्राची आपल्या या प्रियकराला पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याने मालिकेत नवे नाट्यमय प्रसंग घडतील. किंबहुना त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे हस्तगत करून ती रिहापासून दूर नेण्यासाठी प्राची सरदारजीचा वेष घेताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की प्राचीने (मुग्धा चापेकर) कोहली हाऊसमध्ये प्रवेश मिळवून रणबीरची (कृष्णा कौल) पत्नी या नात्याने आपल्या अधिकारांसाठी संघर्ष केला. तसेच रिहाने (पूजा बॅनर्जी) आपल्या दोघांमध्ये हेतूत: गैरसमज निर्माण करून आपल्याला विभक्त केले, हे ती दाखवून देण्याचा प्रयत्न करते.
प्राचीच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून घटस्फोटाच्या कागदावर प्राचीची स्वाक्षरी मिळविण्यात रिहा यशस्वी होते खरी, पण प्राची रिहाचे हे कारस्थान उघड करण्यास सिध्द झाली आहे. प्राची आता प्राप्तिकर अधिकार्याच्या रूपात त्या घरात प्रवेश करणार असून घटस्फोटाची कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न करील. तसेच रिहाविरुध्द काही पुरावा सापडतो का, याचाही ती शोध घेईल आणि तो सापडल्यास रिहाने रणबीरची कशी दिशाभूल केली आहे, तेही दाखवून देईल. या सा घटनांमध्ये बरेच नाट्यमय प्रसंग घडणार असून त्यात प्राची ही दाढीमिशा आणि पगडी अशा शीख अधिकार्याच्या वेषात दिसेल.
आपल्या या नव्या रूपाविषयी प्राची चापेकर म्हणाली, “नवी आव्हानं पेलायला मी नेहमीच तयार असते आणि शीख व्यक्तीच्या या नव्या अवताराने चांगला बदल घडवून आणला. मी आजवर अनेक पोशाख आणि विविध रूपं घेतली असली, तरी मला शीख व्यक्तीचा वेष धारण करायचा आहे, हे समजल्यावर खूपच उत्साह आला. अर्थात शीख व्यक्तीचा वेष घेण्यातही अडचणी होत्या कारण त्यासाठी मला अंगावर वेगळा आणि जड बॉडीसूट चढवावा लागणार होता.
चेहर्यावर दाढी-मिशा चिकटवून तसंच केसांचा टोप आणि पगडी हे 12 तास घालून वावरावं लागणार होतं. पण या नव्या रूपात तुम्ही एक अगदी नवी व्यक्ती बनता, ही त्यातील जमेची बाजू असून ते प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. हा आगामी कथाभाग खूपच मजेदार असून प्रेक्षकांनाही तो पाहताना खूप मजा येईल.”