झी स्टुडिओज प्रस्तुत ‘गुलाबजाम’ या चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर धूम उडवून दिली. दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे दिग्दर्शक म्हणून जितके प्रसिद्ध आहेत तितकेच ते खवय्येही आहेत. त्यांच्या या खवय्येगिरीलाच त्यांनी कथेचा तडका देत एक नवी कोरी डिश म्हणजेच एक खमंग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला तो म्हणजे गुलाबजाम.
गुलाबजाम चित्रपटाची कथा आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) आणि राधा (सोनाली कुलकर्णी) या दोन आपल्या विश्वात गुंतलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरते. आदित्य हा लंडनला नोकरीला असतो, पण त्याची आवड हि स्वयपाक करण्यात असते. त्याला चांगला महाराष्ट्रीय स्वयंपाक शिकायचा असतो आणि त्यासाठी तो थेट पुणे गाठतो. इथे तो चांगला स्वयपाक शिकवणा-या व्यक्तीच्या शोधात असतो. ज्या मित्रांकडे तो रहायला आलेला आहे त्याच्यासाठी आलेला मेसचा डबा जेवायला घेतो. त्यातले जेवण त्याला खूप आवडते. पुढे त्याच डब्यात असलेले गुलाबजाम तो खातो आणि आणखीन भारावून जातो. ते चविष्ट जेवण बनवणाऱ्या बाईचा शोध तो घेतो. ते उत्तम जेवण बनवणारे हात राधाचे असतात. राधा आगरकर ही एकटी राहते. तिचा वेगळा भूतकाळ आहे. तिच्या वागण्याला तिचा भूतकाळ जबाबदार आहे आहे. ती आदित्यला स्वयपाक शिकवण्यास नकार देते. राधा आदित्यला स्वयपाक शिकवणार का? आदित्य स्वयपाक शिकण्यासाठी राधाशी पटवून घेणार का?.