बिग बॉस १८ (Bigg Boss 18) मध्ये सर्व सदस्यांचं मनोरंजन करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) नुकतेच घरातून बाहेर पडल्याची चर्चा आहे. उच्च न्यायालयात एक केस प्रलंबित असल्याने त्यांना बाहेर पडावं लागलं आहे. ही केस सुरु असतानाही ते बिग बॉसच्या घरात कसे जाऊ शकतात असं म्हणत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या केससाठी सदावर्तेंना बाहेर यावं लागलं असून ते नंतर पुन्हा घरात जातील अशीही शक्यता आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते एव्हिक्ट झाल्याची माहिती आहे. हायकोर्टात मराठा आरक्षणाची केस सुरु आहे. गुणरत्न सदावर्तेंनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र ते सुनावणीला गैरहजर राहिल्याने हायकोर्टाने प्रश्न विचारला. त्यावर इतर वकिलांनी ते बिग बॉसमध्ये जाऊन बसले असल्याची माहिती दिली. यावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदावर्ते हे मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिकाकर्ते आहेत. याआधी सदावर्तेंनी आपला युक्तिवाद सर्वात आधी घ्या म्हणून विनंती केली होती. आता तेच गायब झालेत असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. तसंच आता पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता डॉ बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. १९ नोव्हेंपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
सदावर्तेंच्या एक्झिटनंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'एकच तर मनोरंजन करणारा होता','गुणरत्न सदावर्ते नाही तर मजा नाही' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसंच सदावर्ते पुन्हा घरात येण्याचीही शक्यता आहे. केसचं काम झाल्यानंतर त्यांना परत घरात आणलं जाईल अशी चर्चा सुरु आहे.