'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता आहे. अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्याने स्वत:च किडनॅपिंगचं षडयंत्र रचलं असा अंदाज पोलिसांना आला. मात्र अद्याप काहीही हाती लागलेलं नाही. गुरुचरणचे वडील सध्या खूप चिंतेत असून तो बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी घरी काय झालं होतं याचा खुलासा केला आहे.
ई टाईम्सशी बातचीत करताना गुरुचरणचे वडील हरगीत सिंग म्हणाले, "जे झालं ते खूप धक्कादायक आहे. याचा कसा सामना करायचा आम्हाला माहित नाही. आम्ही खूप चिंतेत आहोत आणि पोलिसांकडून काहीतरी अपडेट येईल याची सतत वाट बघत आहोत. आम्ही तो परत येण्याची वाट पाहत आहोत."
ते पुढे म्हणाले, "तो बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी माझा वाढदिवस होता. तो घरी आला होता. आम्ही काहीच सेलिब्रेशन केलं नाही. फक्त आम्ही सगळे एकत्र होतो. सगळे खूश होतो. पुढच्याच दिवशी गुरुचरण मुंबईला जाणार होता."
गुरूचरण सिंग गायब झाल्यामुळे त्याच्यासोबत मालिकेत काम केलेले त्याचे सहकलाकारही चिंतेत आहेत. जेनिफर मिस्त्री, समय शाह आणि मंदार चांदवडकर यांसारख्या अनेक स्टार्सनी त्याच्या बेपत्ता झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो बरा होऊन लवकरच परतेल, अशी आशा त्यांना आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये गुरूचरण सिंग रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसला होता. या व्यक्तिरेखेद्वारे त्यांनी नेहमीच लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. तो शोच्या सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक होता आणि तो एक संस्थापक कलाकार सदस्य देखील होता. २०२० मध्ये, त्याने मालिकेला रामराम केला आणि त्याच्या जागी अभिनेता बलविंदर सिंग सूरी या शोमध्ये आला.