झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या मालिकेत रंजक वळण आले आहे. राधिका शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेली असताना तिच्यावरच पैसे चोरल्याचा आरोप होतो. हे पैसे कोणी चोरले, याचा शोध पोलिस घेत असताना ऑफिसमधील सुरक्षारक्षक पोलिसांना जी माहिती देतो त्यावरून हा संशय शनायावर जातो.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत सध्या राधिका शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी पत्रकार परीषदेत जाते. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी जेव्हा ती सुटकेस उघडते तेव्हा त्यात पैशांऐवजी दगड दिसतात. त्याच्यानंतर राधिकावर उलटसुलट चर्चा होते. दरम्यान राधिकाचा नवरा गुरूनाथ सुभेदारला खूप आनंद होतो आणि तो सर्वांसमोर राधिकाचा अपमान करण्यात यशस्वी होतो.
राधिकाच्या ऑफिसमध्ये शेतकरी राधिकावर पैसे चोरल्याचा आरोप करू लागतात आणि बरीच टीका करू लागतात. हे सगळे ऐकून राधिकाला रडू कोसळते. एकीकडे राधिका मसाले कंपनीची सगळीकडे बदनामी होते. म्हणून राधिका खूप चिंतेत असते.