Join us

श्रेया बुगडेच्या माहेरी खास पद्धतीने साजरी होते हनुमान जयंती, अभिनेत्री लिहिते- "हूप हूप असं म्हणत आमचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:08 IST

श्रेया बुगडेने तिच्या माहेरी हनुमान जयंतीचा उत्सव कसा साजरा होतो, याविषयी खास माहिती सर्वांना सांगितली आहे (shreya bugde)

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने (shreya bugde) सोशल मीडियावर तिने हनुमान जयंती कशी साजरी केली याविषयी सर्वांना सांगितलं आहे. श्रेयाने सुंदर फोटो शेअर करुन ही माहिती सर्वांपर्यंत पोहचवली आहे.  श्रेया लिहिते की, "माझ्या माहेरी, घराच्या समोर हनुमानचे अतिशय सुंदर टूमदार असं देऊळ आहे ….. माझ्या लहानपणापासून दर वर्षी हनुमान जयंती आली की महिनाभर आधी पासून कॉलनीतल्या सगळ्यांची लगबग सुरु व्हायची …. मला आठवतंय लहानपणी पहाटे चार पासून हनुमान जयंतीच्या दिवशी आरती, कीर्तन, आणि भजनानी दिवसाची सुरुवात व्हायची .. मग ‘हूप हूप’ अस म्हणत आमचे डॉक्टर काका सगळ्या पोरांना चॉकलेटं आणि फळ वाटायचे."

"मग पुस्तक प्रदर्शनातून खूप सारी पुस्तकं बाबा मला आणि माझ्या बहिणीला घेऊन द्यायचे . . ती पुस्तकं घरी घेऊन येतानाचा आनंद काही औरंच. मग प्रसादाचा सुंठवडा शिंक येई पर्यंत चाटून पुसून खायचा. दिवसभर देवळात भक्तांची गर्दी आणि प्रत्येयकाच्या घरातून ‘creative’ असा प्रसाद यायचा आणि त्याची आरास मांडायची. मग संध्याकाळी पाच वाजता मारुती रायाची पालखी देवळातून निघायची खूप गर्दीत वाजत गाजत ढोल ताशे, लेझिम पथक, प्रत्येक घरासमोर थांबून सगळे रहिवाशी आरती करत आणि सुंदर अश्या रांगोळ्या घरोघरी दिसत."

"पालखी परत देवळात यायला रात्रीचे १२ वाजायचे. .. मग महाआरती आणि प्रसादाचे पन्ह आणि महाप्रसाद .अहाहा! ! गंम्मत अशी की ४० - ४२ वर्ष चालत आलेला हा उत्सव ही प्रथा अजूनही पिढ्या दर पिढ्या तशीच किंबहुना जास्त उत्साहात सुरु आहे. मी अजूनही आवर्जून ह्या दिवशी अनेक वर्ष माहेरी येण्याचा प्रयत्न करते आणि माझ्यासारख्या माझ्या अनेक मैत्रिणी सुद्धा. . ह्या निम्मिताने सगळ्यांची भेट होते. आमची ही कॉलनी निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गावच जाणू. . मी सोशल मीडिया वर फार व्यक्त होत नाही पण हे आज आवर्जून लिहावंसं वाटतंय कारण सध्याच्या परिस्थितीत जर काही जपून ठेवावंसं वाटतय तर ते हेच आणि येवढच....."

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्याहनुमान जयंतीमराठी अभिनेताटेलिव्हिजन