आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी(Milind Gawali) यांनी साकारली आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. दरम्यान नुकताच त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एक लहान मुलगी पाहायला मिळत आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, शूटिंगमध्ये सगळ्यात कठीण काम काय असेल तर लहान बाळांबरोबर, लहान मुलांबरोबर ,प्राण्यांबरोबर शूटिंग करणं सगळ्यात कठीण असतं, खूप कमी डायरेक्टरांना लहान मुलांबरोबर काम करता येतं, लहान मुलांच्या कलानी घ्यायचं असतं हे त्यांना माहितीच नसतं, माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये म्हणजे “ वक्त से पहिले “ मध्ये, एक सीन होता , की लहान बाळ रडतय आणि ते बाळ शांत होतं , रडत नव्हतं , एका असिस्टंट ने त्या बाळाला जाऊन चिमटा काढला, ते बाळ कळवळ आणि मोठ्याने रडायला लागला, माझ्यासाठी तो खूप मोठा धक्का होता, मी त्या असिस्टंटला त्या सिनेमांमध्ये काढायलाच लावलं, त्या अनुभवानंतर मी माझ्या मनामध्ये ठरवून टाकलं की आपण आपल्या बाळाला कधीही या सिनेमा च्या शूटिंगसाठी पाठवायचं नाही.
पुढे त्यांनी लिहिले की, एकदा जया बच्चन यांची प्रॉडक्शनची एक सिरीयल सात फेरे नावाची, त्यात मी काम करत होतो, एक छोटीशी सहसा वर्षाची मुलगी जिने मराठीमध्ये “कळत नकळत” नावाचा चित्रपट केला होता, ती काम करत होती, मदन बावरिया नावाचे कुणीतरी डायरेक्टर होते, डायलॉग व्यवस्थित बोलता येत नाहीत म्हणून ते तिला इतके ओरडले की ती मुलगी ओक्साबोक्शी रडायला लागली, त्या डायरेक्टरनी त्या मुलीला काढून टाकले. देबू देवधर त्या सिरीयलचे कॅमेरामन होते, मग त्यांची लेक सई तिला बोलवण्यात आलं, सई पण लहान होती, तिचे बाबाचं कॅमेरामन होते , त्याच्यामुळे तिच्यावर काही त्या डायरेक्टरला ओरडता वगैरे आलं नाही. गपचूप सईचं सगळं त्यांना ऐकावं लागतं होत, तिच्या कलानी घ्यावं लागत होतं, ते बघून मला फार आनंद झाला होता.